कर्नाटकनंतर आसामच्या पथकाकडूनही महावितरण कंपनीच्या विविध योजनांचा अभ्यास करण्यात येत आहे. त्यासाठी हे पथक राज्यात दाखल झाले आहे.
आसामचे आयुक्त व ऊर्जा सचिव अनुराग गोयल यांच्या नेतृत्वाखाली मुख्य महाव्यवस्थापक अशोक चंद्र शर्मा, महाव्यवस्थापक दुलाल सैकिया व लेखाधिकारी नील डेब आदींचे हे पथक ‘महावितरण’च्या मुख्यालयात दाखल झाले. महावितरण कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अजय मेहता, संचालक (प्रकल्प) प्रभाकर शिंदे, संचालक (संचलन) अभिजित देशपांडे, मुख्य अभियंता (पायाभूत आराखडा) दिनेश साबू, मुख्य अभियंता (अंतर्गत सुधारणा) सुधीर वडोदकर यांच्याशी या पथकाने चर्चा केली.  
महावितरण कंपनीच्या विविध योजनांची पथकाला माहिती देण्यात आली. ‘महावितरण’च्या योजना आसाममध्ये राबविण्याचा संकल्प असून, त्यासाठी सहकार्य करावे, अशी विनंती या वेळी करण्यात आली. त्यावर सर्वप्रकारचे सहकार्य देण्याचे आश्वासन मेहता यांनी आसामच्या पथकाला दिले.