पाटबंधारे विभागाच्या पानशेत येथील उपविभागीय कार्यालयाने वीजबिलाची एक कोटी ६७ लाख २० हजार रुपयांची थकबाकी आहे. या थकबाकीचा भरणा न केल्यास २८ नोव्हेंबरला पानशेतच्या कर्मचारी वसाहतीचा वीजपुरवठा खंडित करण्यात येणार असल्याचे महावितरण कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
पानशेत येथील उपविभागीय अधिकारी, मुठा कालवा यांच्या नावाने उच्चदाब वीजजोडणी देण्यात आली आहे. या वीजजोडणीतून पानशेत कर्मचारी वसाहतीला वीजपुरवठा करण्यात येतो. या जोडणीची ऑक्टोबर २०१४ अखेर वीजबिलाची थकबाकी आहे. थकबाकी भरण्याबाबत नियमित व दरमहा नोटिसाही पाठविण्यात आल्या आहेत. वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करूनही पाटबंधारे विभागाने थकीत वीजबिल भरण्याबाबत कोणतीही कार्यवाही केली नाही. २७ ऑक्टोबरलाही नोटीस बजावून थकबाकी भरण्याबाबत १५ दिवसांची नोटीस देण्यात आली होती. मात्र, त्यावरही कोणती कार्यवाही झाली नाही.
पाटबंधारे विभागाच्या पुणे मंडळाचे अधिक्षक अभियंता यांना २० नोव्हेंबरला पत्र पाठविण्यात आले असून, येत्या २७ नोव्हेंबपर्यंत थकबाकीचा भरणा न केल्यास वीजपुरवठा खंडित करण्यात येईल. त्याची जबाबदारी पाटबंधारे विभागावर असेल, असे महावितरण कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.