वीजनिर्मिती संचामध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे रविवारपासून विजेची तूट निर्माण झाल्याने पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील काही विभागांमध्ये सोमवारी सलग दुसऱ्या दिवशीही वीजकपात करण्यात आली. विजेची तूट भरून काढण्याचे प्रयत्न सुरू असले, तरी ही वीजकपात आणखी किती दिवस करावी लागेल, याचे नेमके उत्तर मिळालेले नाही.
अदानी, इंडिया बुल्स, जेएसडब्ल्यू व केंद्रीय प्रकल्पातील वीजनिर्मितीचे काही संच रविवारी अचानक बंद पडल्याने राज्यात सुमारे तीन हजार मेगावॉट विजेची तूट निर्माण झाली. त्यामुळे राज्यामध्ये सध्या तीन ते सहा तासांची वीजकपात करण्यात येत आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड शहरामध्ये रविवारी ‘ब’ विभागातील काही वाहिन्यांवर दोन तासांची वीजकपात करण्यात आली. सोमवारी दोन्ही शहरातील काही वाहिन्यांवर पावणेदोन तासांचे, तर काही वाहिन्यांवर दुपारी दोन ते चार या वेळेत दोन तासांची चक्राकार वीजकपात करण्यात आली.
राज्यातील विजेचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी ‘महावितरण’ने सोमवारी केंद्रीय पॉवर एक्स्चेंजमधून सुमारे १,२०० मेगावॉट, तर अल्पकालीन वीज खरेदीतून २८५ मेगावॉट वीज घेण्यात आली. त्याचप्रमाणे काही वीजनिर्मिती संच सुरू करण्यात आले. मात्र, तरीही सुमारे दोन हजार मेगावॉट विजेची तूट निर्माण होत असल्याने वीजकपात करावी लागत असल्याचे ‘महावितरण’कडून कळविण्यात आले आहे.
विजेची तूट भरून काढण्यासाठी केंद्रीय पॉवर एक्स्चेंजमधून जास्तीत जास्त वीज घेण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. अचानकपणे सुरू झालेली वीजकपात लवकर संपावी, यासाठी प्रयत्न सुरू असून, ग्राहकांनी या काळात सहकार्य करावे, असे आवाहनही ‘महावितरण’ने केले आहे.