पावसाळ्याचे दिवस आले की पावसाबरोबरच विजेच्या समस्या व तक्रारींचाही धोधो पाऊस शहरात पडत असतो. यंदाचा पावसाळाही त्याला अपवाद ठरलेला नाही. पावसाळा सुरू होताच शहरामध्ये वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. मागील तीन ते चार दिवसात शहराच्या विविध भागात दीर्घकाळ वीज जाण्याचे प्रकार झाल्याने नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. दीर्घकाळ वीज खंडित होण्याच्या विविध कारणांमध्ये भूमिगत वाहिन्यांमधील बिघाड हे महत्त्वाचे कारण आहे. विविध शासकीय यंत्रणांकडून हलगर्जीपणे होणाऱ्या खोदाईतून भूमिगत वाहिन्यांबाबत निर्माण होणाऱ्या समस्या व वीज कर्मचाऱ्यांची अनभिज्ञता या दोन्ही गोष्टींचा फटका वीज ग्राहकांना बसतो आहे.
पावसाळ्याध्ये झाडाच्या फांद्या वीजवाहिन्यांवर पडून किंवा वादळामुळे विजेचा खांब कोसळून वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार होतात. काही वेळाच्या दुरुस्तीच्या कामानंतर हा वीजपुरवठा खंडित होतो. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये शहरातील विविध भागामध्ये १० ते २० तास वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार झाले आहेत. शहरात मोसमी पावसाने हजेरी लावल्यानंतर यंदाही शहराच्या विविध भागामध्ये दीर्घकाळ वीज खंडित होण्याचे प्रकार घडले. भूमिगत वीजवाहिन्यांमध्ये निर्माण होणारा बिघाड हे त्याचे प्रमुख कारण असल्याचे स्पष्ट झाले आहे. शहराच्या बहुतांश भागामध्ये आता भूमिगत वीजवाहिन्यांचे जाळे पसरविण्यात आले आहे. वीजवाहिन्या भूमिगत केल्यामुळे इतर वेळेला विजेची समस्या जाणवत नसली, तरी पावसाळ्यात हीच भूमिगत वाहिनी त्रासदायक ठरते आहे.
महावितरण कंपनीच्या भूमिगत वाहिन्या असणाऱ्या भागामध्ये इतर शासकीय विभागांकडूनही खोदाई केली जाते. महावितरण कंपनीशी कोणत्याही प्रकारे समन्वय न साधता ही खोदाई होत असल्याने खोदाईमध्ये कधी-कधी भूमिगत वाहिनीवरील आवरण फाटले जाते. माती टाकून खड्डा बंद केल्यानंतर हा प्रकार लक्षात येत नाही. मात्र, पावसाळ्यात या भागात पाणी साचल्यास हे पाणी फाटलेल्या आवरणाद्वारे वाहिनीतच शिरते व त्या ठिकाणी हलका स्फोट होऊन संपूर्ण वाहिनीच बंद पडते. अशा भूमिगत वाहिनीमध्ये नेमका कोणत्या ठिकाणी बिघाड झाला हे शोधणे काही वेळेला अत्यंत कठीण असते.
भूमिगत वाहिनीमध्ये बिघाड झाल्यानंतर तत्परतेने काम करण्याची अपेक्षा वीज कर्मचाऱ्यांकडून व्यक्त केली जाते. मात्र, काही वेळेला कर्मचाऱ्यांच्या अनभिज्ञतेमुळेही वीजपुरवठा पूर्ववत होण्यास विलंब लागत असल्याचे दिसते. यंदाही हा मुद्दा समोर आला. मुळात भूमिगत वीजवाहिन्या टाकण्याचे काम करणारा ठेकेदार वेगळा असतो व त्याने टाकलेल्या वाहिन्यांचा नकाशा उपलब्ध नसतो. संबंधित भागात काम करणारे वीज कर्मचारी किंवा अधिकारी त्या भागात नवीन असल्यास त्यांना भूमिगत वाहिनीचा थांगपत्ताही लागत नाही. बी. टी. कवडे रस्ता भागामध्ये मंगळवारी १६ तास वीजपुरवठा खंडित झाला होता. त्या वेळी ही समस्या प्रामुख्याने जाणवली. या भागामधील बहुतांश अधिकारी दुसरीकडून बदलून आलेले होते. त्यांना या भागातील वीजयंत्रणेची माहिती नव्हती. याच कारणाने वीजपुरवठा सुरळीत होण्याचा कालावधी लांबत गेला.
नेमका पावसाळा आल्यानंतरच समस्या निर्माण होत असताना वर्षभर होणाऱ्या रस्त्याच्या खोदाईबाबत सर्वच शासकीय यंत्रणामध्ये समन्वयाची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे. मात्र, त्यासाठी कोणीच पुढाकार घेत नसल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत प्रामाणिकपणे वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांना मात्र फटका बसतो आहे.