गैरसमजातून प्रकार घडल्याचा दावा; माफीनाम्यानंतर प्रकरण मिटले

निगडीतील विस्कळीत पाणीपुरवठय़ाचे कारण पुढे करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी पालिकेच्या कनिष्ठ अभियंत्यास मारहाण करण्याची घटना गुरूवारी घडली. या वेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयाची तोडफोडही केली. तथापि, एका अधिकाऱ्याचा राग दुसऱ्यावर निघाल्याचे नंतर उघड झाले. त्यामुळे गैरसमजातून प्रकार घडल्याचा दावा करत माफीनाम्यानंतर प्रकरण मिटवून घेण्यात आले.

सचिन चिखले यांच्या पत्नी अश्विनी चिखले निगडी गावठाण प्रभागाच्या नगरसेविका आहेत. गेल्या काही दिवसांपासून या भागातील पाणीपुरवठा विस्कळीत होता.

वारंवार पाठपुरावा करूनही अधिकारी दाद देत नव्हते. त्यामुळे वैतागलेल्या चिखले यांनी ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयावर मोर्चा नेला. तथापि, ज्या अधिकाऱ्याकडे हे काम होते. त्यांच्याऐवजी अभियंता सन्मान भोसले यांनाच मारहाण करण्यात आली. या वेळी मनसे कार्यकर्त्यांनी कार्यालयाची तोडफोड केली. त्यानंतर, कर्मचाऱ्यांनी काम बंद करण्याचा पवित्रा घेतला. तर, कर्मचारी महासंघाने पोलिसांकडे तक्रार करण्यासाठी धाव घेतली.

तथापि, अभियंता भोसले यांनी तक्रार दाखल न करण्याची आणि प्रकरण न वाढवण्याची भूमिका घेतली. त्यामुळे परस्पर ‘सामंजस्य’ दाखवून प्रकरण मिटवण्यात आले. यासंदर्भात, दोन्हीकडून अधिक भाष्य न करण्याची भूमिका घेण्यात येत होती.