एसटीच्या संपामुळे सलग दुसऱ्या दिवशी प्रवाशांचे हाल

एसटी कर्मचाऱ्यांनी १७ ऑक्टोबरपासून पुकारलेल्या संपामुळे दिवाळीसाठी विविध ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांसाठी प्रशासनाच्या वतीने खासगी प्रवासी गाडय़ांना वाहतुकीची परवानगी दिली आहे. मात्र, एसटी स्थानकांतून प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांकडून नाडलेल्या प्रवाशांची अक्षरश: लूट केली जात आहे. मनमानी पद्धतीने भाडेवसुली होत असताना कोणताही पर्याय नसल्याने प्रवाशांना तक्रार करण्याचीही सोय राहिली नाही. प्रशासनाने या मनमानी भाडेवसुलीकडे कानाडोळा केल्याचे चित्र आहे. दरम्यान, संप कायम राहिल्याने सलग दुसऱ्या दिवशीही प्रवाशांचे हाल झाले.

सातव्या वेतन आयोगाची मागणी करीत एसटीच्या कामगारांनी संपाचे हत्यार उपसले आहे. ऐन दिवाळीत पुकारण्यात आलेल्या या संपामुळे प्रवाशांचे मात्र मोठय़ा प्रमाणावर हाल होत आहेत. दिवाळीसाठी प्रवास करणाऱ्यांची गैरसोय टाळण्याच्या दृष्टीने एसटी विभागीय कार्यालय, आरटीओ प्रशासन आणि खासगी वाहतूकदारांची बैठक झाली. या बैठकीत खासगी वाहतूकदारांना एसटी स्थानकातून प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी देण्यात आली. एसटीच्या दरातच खासगी वाहतूकदारांनी सेवा देण्याची विनंतीही करण्यात आली. त्यानुसार खासगी गाडय़ांच्या माध्यमातून एसटी स्थानकातून प्रवाशांची वाहतूक सुरू करण्यात आली. मात्र, प्रवाशांची गरज ओळखून खासगी वाहतूकदारांनी मनमानी पद्धतीने भाडेवसुली सुरू केली आहे.

स्वारगेट स्थानकातून दिवसभरात १४७ खासगी आराम बस आणि इतर वाहने सोडण्यात आली. प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार कोल्हापूरसाठी आठशे ते नऊशे रुपये, साताऱ्यासाठी सहाशे रुपये, तर पंढरपूरसाठी हजार रुपयांहून अधिक तिकीट दर आकारला जात होता. मनमानी तिकीट आकारणीबरोबरच एकाच गाडीमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक केली जात होती. प्रवासासाठी इतर कोणताही पर्याय दिसत नसल्याने एसटी स्थानकातील खासगी गाडय़ांचा पर्याय काहींनी स्वीकारला.

मनमानी भाडेआकारणीबाबत प्रशासनाकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. एसटी महामंडळानेही याबाबक काही भूमिका घेतली नाही. पुणे विभागाचे विभागीय नियंत्रक श्रीनिवास जोशी म्हणाले, की प्रवाशांसाठी जास्तीत जास्त वाहने उपलब्ध करून देण्याची आमची जबाबदारी आहे. मात्र, खासगी वाहतूकदारांच्या तिकिटाच्या दरावर नियंत्रण ठेवणे आमचे काम नाही.

संपात सहभागी कर्मचाऱ्यांना विश्रांतिगृहातून काढले

एसटीचा १७ ऑक्टोबरला सुरू झालेला संप दुसऱ्या दिवशीही कायम राहिला. काही तोडगा निघून गाडय़ा सुरू होतील, अशी शक्यता वाटत असल्याने बाहेरगावच्या चालक आणि वाहकांनी एसटीच्या विश्रांतिगृहातच राहणे पसंत केले आहे. मात्र, चालक- वाहकांच्या विश्रांतिगृहाचा चुकीचा वापर होत असल्याचे कारण देत एसटी प्रशासनाने सर्व चालक, वाहकांना बाहेर काढून विश्रांतिगृहांना टाळे लावले आहे. स्वारगेट डेपोमध्ये असलेल्या विश्रांतिगृहाला टाळे लावताना एसटी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांमध्ये वाद झाला. मात्र, पोलिसांच्या मध्यस्तीने विश्रांतिगृह बंद करण्यात आले.