देशभरातील ज्येष्ठ गायक-वादक आणि कीर्तनकारांनी गणराया चरणी आपली सेवा रुजू केली, अशा सरदार मुजुमदारवाडय़ातील गणेशोत्सव यंदा २५० व्या वर्षांत पदार्पण करीत आहे. पंचधातूच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करून सोमवारी गणेशोत्सवास प्रारंभ झाला. पारंपरिक उत्सवाबरोबरच यंदा विशेष प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
दाते पंचांगानुसार भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थीला घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात होते. मात्र, मुजुमदारवाडय़ातील गणेशोत्सवास भाद्रपद शुद्ध प्रतिपदेपासून गणरायाची प्रतिष्ठापना करून प्रारंभ होतो. पंचमीला लळीत आणि तीर्थप्रसादाचे कीर्तन होऊन या उत्सवाची सांगता होते. शनिवारवाडय़ाजवळील सरदार मुजुमदार यांचा वाडा म्हणजे कलाकारांचे आश्रयस्थान होते. रसिकाग्रणी सरदार आबासाहेब मुजुमदार यांच्यासमोर कला सादर करून त्यांची दाद मिळविणे हे कलाकारांसाठी महत्त्वाचे असायचे. मुजुमदार यांच्या वाडय़ातील गणेशोत्सवामध्ये कला सादरीकरणाची संधी ही त्या कलाकारासाठी पर्वणी असे. आबासाहेबांचे नातू प्रतापराव मुजुमदार आणि नातसून अनुपमा मुजुमदार यांनी ही परंपरा जतन केली आहे.
मुजुमदार यांच्या देवघरातील पंचधातूची गणेशमूर्ती वाजतगाजत दिवाणखान्यामध्ये आणण्यात आली. विधिवत पूजा करून मयूरासनाच्या मखरामध्ये गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. यंदाच्या उत्सवामध्ये गंगाधरबुवा व्यास, पुंडलिकबुवा हळबे, मििलदबुवा बडवे, मोरेश्वरबुवा जोशी आणि शेखरबुवा व्यास यांचे कीर्तन, तर दररोज सकाळी प्रमोद गायकवाड यांचे सनईवादन होणार आहे. पंचमीला लळिताचे कीर्तन आणि तीर्थप्रसादाचा कार्यक्रम झाल्यानंतर गणेशमूर्तीवर पडदा टाकून विसर्जन होते. दुसऱ्या दिवशी ही मूर्ती पुन्हा देवघरामध्ये ठेवली जाते, असे प्रतापराव मुजुमदार यांनी सांगितले.
गणेशोत्सवाच्या अडीचशेव्या वर्षांचे औचित्य साधून एका विशेष प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. शंभर वर्षांपूर्वीच्या उत्सवाच्या निमंत्रणपत्रिका, त्या वेळच्या कलाकारांची छायाचित्रे आणि निवडक पत्रव्यवहाराचा त्यामध्ये समावेश आहे. उस्ताद रहिमत खाँ, पं. रविशंकर, उस्ताद हाफिज अली खाँ, पंडितराव नगरकर, अंजनीबाई मालपेकर, उस्ताद विलायत खाँ, प्रभुदेव सरदार, दुर्गाबाई शिरोडकर, पं. भीमसेन जोशी, डॉ. वसंतराव देशपांडे, पं. जितेंद्र अभिषेकी अशा दिग्गज कलाकारांनी मुजुमदार वाडय़ातील गणेशोत्सवामध्ये सेवा रुजू केली होती. त्यापैकी काही छायाचित्रांना या प्रदर्शनाच्या माध्यमातून उजाळा मिळणार आहे, असे अनुपमा मुजुमदार यांनी सांगितले.