‘उडता पंजाब’ या चित्रपटाला चित्रपटामध्ये परिनिरीक्षण मंडळाने सुचवलेल्या बदलांचे कवित्व गाजले आणि प्रसारमाध्यमांमधून पंजाबमधील व्यसनाधीतनेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला. या व्यसनाधीनतेवर पंजाबमध्ये काही संस्थांकडून काम सुरू असून त्यातील एका प्रकल्पाला ‘मुक्तांगण मित्र’ या पुण्यातील संस्थेची मदत मिळाली आहे.
अफगाणिस्तानातून पाकिस्तानमार्गे ‘हेरॉईन’ आणि अफू पंजाबात येतात. तसेच राजस्थानातून हरियाणामार्गे ‘स्मॅक’ आणि अफू येतो, तर हिमाचल प्रदेशातून नशेसाठी वापरली जाणारी औषधे येतात. ‘फतेह फाउंडेशन’, ‘डॉर्फ केटल ग्रुप’ आणि मुक्तांगण मित्र यांनी एकत्रितपणे पंजाबातील व्यसनमुक्तीसाठी काम सुरू केले असून तिथल्या व्यसनाधीनतेसंबंधी या संस्थांनी एक सर्वेक्षणही केले होते. त्या आधारे फतेह फाउंडेशनने ३० समुपदेशकांचा एक गट तयार केला आणि त्यांना ‘मुक्तांगण मित्र’च्या तज्ज्ञांनी प्रशिक्षण दिले. यातून पंजाबातील ‘तरण तारण’ या जिल्ह्य़ात घरोघर जाऊन जागृतीपर कार्यक्रम राबवण्यास सुरुवात झाली. व्यसनाधीन लोक आता मार्गदर्शन आणि उपचार घेण्यासाठी पुढे येऊ लागल्याचे या प्रकल्पाचे निरीक्षण आहे.
‘मुक्तांगण’च्या उपसंचालक मुक्ता पुणतांबेकर आणि या प्रकल्पातील ‘मुक्तांगण’चे समन्वयक संजय भगत यांनी दिलेल्या माहितीनुसार, फतेह फाउंडेशनने फेब्रुवारीत अमृतसरमध्ये व्यसनाधीन व्यक्तींसाठी समुपदेशन, वैद्यकीय चाचण्या आणि उपचार देणारा बाह्य़रुग्ण विभाग सुरू केला असून तीन महिन्यांच्या कालावधीत त्याद्वारे तीनशे रुग्णांनी मदत घेतली आहे. यात व्यसनाधीन व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबीयांना प्रवासखर्च दिला जातो, तसेच मोफत मार्गदर्शन केले जाते. चाचण्या आणि औषधोपचारही मोफत होतात. प्रकल्पाचा खर्च फतेह फाउंडेशन आणि डॉर्फ केटल या संस्थांकडून संयुक्तपणे केला जातो. भगत म्हणाले, ‘‘ऑक्टोबर २०१६ मध्ये ‘तरन तरन’ जिल्ह्य़ात एक निवासी व्यसनमुक्ती उपचार केंद्र सुरू करण्याचा विचार आहे.
व्यसनमुक्त होणारे रुग्ण व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबीयांचे कौशल्य विकसन हा त्याच्या पुढचा टप्पा असेल. संगणकाचे प्रशिक्षण, शिवण व स्वयंपाकाचे तसेच पंजाब शेतीप्रधान असल्यामुळे शेती उपकरणांच्या दुरुस्तीचे प्रशिक्षण सुरू केले जाईल. सुरक्षा पुरवण्याच्या व्यवसायासंबंधीच्या प्रशिक्षणाचाही त्यात समावेश असेल.’’