संरक्षण खात्याची जमीन निवासी करणे, बांधकाम व्यावसायिकांसाठी रस्ते हलवणे, आरक्षणे बदलणे आदी प्रकारांबरोबरच सध्या अस्तित्वात असलेला औंध-बोपोडी भागातील मुळा डावा कालवा हलवून तो पुणे विद्यापीठाच्या हद्दीत दाखवण्याचाही गंभीर प्रकार महापालिकेने विकास आराखडय़ातून केल्याची तक्रार आयुक्तांकडे करण्यात आली आहे.
शहरासाठी तयार करण्यात आलेल्या विकास आराखडय़ात अनेक धक्कादायक प्रकार झाले असून कालव्याचे क्षेत्र बदलण्याचाही प्रकार प्रशासनाने केल्याची लेखी तक्रार काँग्रेसचे प्रदेश सचिव, नगरसेवक संजय बालगुडे यांनी शनिवारी केली. नाला हलवण्याची ही चूक संगनमताने व जाणीवपूर्वक झालेली असल्यामुळे ही बाब गांभीर्याने घ्यावी, असेही बालगुडे यांनी या तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकाराची माहिती पत्रकार परिषदेत देताना ते म्हणाले, की पुणे शहरातील डावा मुळा कालव्याचे नियोजन अठराव्या शतकापासून आहे. अलीकडच्या काही वर्षांत हा कालवा बंद आहे आणि काही ठिकाणी कालवा बुजवून तेथे महापालिकेने रस्तेही केले आहेत. औंध-बोपोडी भागातील या कालव्याचा वापर होत नसला, तरी तो आजही अस्तित्वात असून त्याच्या बाजूने रस्ताही आहे. महापालिकेने तयार केलेल्या १९८७ च्या विकास आराखडय़ातही हा कालवा सर्वेक्षण क्रमांक ३६, ६९ व ८६ ते ९० जुना बोपोडी या भागातून दर्शवण्यात आला आहे.
सध्या प्रसिद्ध झालेल्या आराखडय़ात मात्र हा कालवा हलवून तो थेट पुणे विद्यापीठाच्या हद्दीत दर्शवण्यात आला आहे. त्यामुळे मूळ कालव्याची जागा आपोआप निवासी वापरासाठी मोकळी होणार आहे. ही मुद्रणातील चूक वा नजरचूक वा किरकोळ चूक नाही. तसेच एका ठिकाणी असलेला कालवा अशाप्रकारे दुसरीकडे हलवता येत नाही. कालवा ही वॉटरबॉडी आहे. त्याची रेषा बदलण्यासाठी वा त्याची जागा ताब्यात घेण्यासाठी विशिष्ट शासकीय प्रक्रिया निश्चित करण्यात आली आहे. त्यासाठी पाटबंधारे खात्याचीही नियमप्रणाली आहे आणि कुठेही हलवता येईल वा उठवता येईल असे वॉटरबॉडी हे आरक्षण नाही. त्यामुळे कालव्याचे क्षेत्र हलवून ते अन्यत्र दर्शवण्याचा हा प्रकार गंभीर आहे, असेही बालगुडे यांनी सांगितले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 2, 2013 2:55 am