X

पुणे शहर आता मल्टिप्लेक्सचे आगर

राज्य शासनाने २००० मध्ये मल्टिप्लेक्स चित्रपटगृहांच्या निर्मितीला परवानगी देण्याचा कायदा केला.

१० नव्या मल्टिप्लेक्सद्वारे ५४ स्क्रीनची भर; शहरात आता केवळ १६ एकपडदा चित्रपटगृहे

एकपडदा चित्रपटगृहांचे माहेरघर असलेले पुणे शहर आता बहुपडदा चित्रपटगृहांचे म्हणजेच मल्टिप्लेक्सचे आगर होत आहे. शहराच्या विविध भागांमध्ये सध्या २३ मल्टिप्लेक्स असून ११६ स्क्रीन्सच्या माध्यमातून सिनेरसिक चित्रपट पाहण्याचा आनंद लुटत आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात लवकरच दहा प्रस्तावित मल्टिप्लेक्सची भर पडत असून याद्वारे ५४ स्क्रीन्स वाढणार आहेत.

राज्य शासनाने २००० मध्ये मल्टिप्लेक्स चित्रपटगृहांच्या निर्मितीला परवानगी देण्याचा कायदा केला. त्यानंतर सातारा रस्त्यावरील सिटी प्राईड हे पहिले मल्टिप्लेक्स अस्तित्वात आले. त्यानंतर सिटी प्राइड कोथरूड, मंगला, अभिरुची, आर डेक्कन, रॉयल सिनेमा (िपपळे सौदागर) अशी सिटी प्राइड मल्टिप्लेक्सची रांग लागली. सिनेपोलीस, आयनॉक्स, ई-स्क्वेअर, गोल्ड बिग सिनेमा असे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय उद्योग मल्टिप्लेक्स व्यवसायामध्ये उतरले. उत्तम आसनक्षमता, चकचकीत चित्रपटगृह, प्रेक्षकांना आल्हाददायक वाटणारी वातानुकूलन यंत्रणा यामुळे चित्रपट हा केवळ मल्टिप्लेक्समध्येच जाऊन पाहण्याची सवय लागली. त्याचाच परिणाम म्हणून गेल्या १६ वर्षांत पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरामध्ये तब्बल २३ मल्टिप्लेक्सची साखळी उभी राहिली आहे. या मल्टिप्लेक्समध्ये मिळून ११६ स्क्रीन्स आहेत. राहुल (शिवाजीनगर), वैभव (हडपसर) आणि फन स्क्वेअर (तळेगाव) यांसह ‘मंगला’ या एकपडदा चित्रपटगृहाचे दोन स्क्रीनचे चित्रपटगृह झाले आहेत.

आगामी कालखंडात पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरामध्ये आणखी दहा मल्टिप्लेक्सची भर पडणार आहे. पॅसिफिक मॉल (सेव्हन लव्हज चौक), पुणे कन्व्हेन्शन सेंटर (सेनापती बापट रस्ता), दोराबजी मॉल (उंड्री), सिटी सेंटर (पिंपरी), एल्प्रो मॉल (चाफेकर चौक, चिंचवड), सिटी प्राइड-एनआयबीएम रस्ता (महंमदवाडी), पी-थ्री डेव्हलपर्स (मोशी रस्ता, भोसरी), ईशान्य मॉल (येरवडा), काकडे सिटी (कोथरूड) या मल्टिप्लेक्सच्या माध्यमातून ५४ स्क्रीन वाढणार आहेत. सध्या पुण्यामध्ये १६ एकपडदा चित्रपटगृहे सुरू आहेत. गेल्या काही वर्षांत १५ एकपडदा चित्रपटगृहे बंद पडली आहेत. बदलत्या काळानुसार विकसित होत गेलेलय़ा मल्टिप्लेक्स संस्कृतीने सध्या सुरू असलेल्या एकपडदा चित्रपटगृहांच्या संख्येवर मात केली आहे.

एकपडदा चित्रपटगृहांसमोर अडचणींचा डोंगर

सध्याच्या मल्टिप्लेक्स संस्कृतीमध्ये एकपडदा चित्रपटगृहांसमोर अडचणींचा डोंगर आहे. नोटाबंदी, जीएसटी यामुळे प्रेक्षक एकपडदा चित्रपटगृहांकडे फिरकत नाहीत. मल्टिप्लेक्समध्ये करमणूक क्षेत्रातील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील उद्योगसमूह पैसे गुंतवत आहेत. त्यातुलनेत एकपडदा चित्रपटगृह चालकांकडे चित्रपटगृहाच्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी पैसे नाहीत हे सध्याचे वास्तव आहे. एकपडदा चित्रपटगृहचालकांना दुसऱ्या व्यवसायामध्ये प्रवेश करण्याची परवानगी मिळावी, तसेच सध्याच्या चित्रपटगृहाच्या जागेवर छोटय़ा आसनक्षमतेचे चित्रपटगृह ठेवताना अन्य जागा विकसित करण्यासाठी वाढीव चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) मिळावा, अशी मागणी सरकारकडे केली असल्याचे सिनेमा ओनर्स अँड एक्झिबिटर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष दीपक कुदळे यांनी सांगितले.

Outbrain