भारतीय हवामान शास्त्र विभागाने सोमवारी उन्हाळी हंगामातील दीर्घकालीन अंदाज जाहीर केला. त्यानुसार राज्यात मुंबई, ठाणे आणि परिसरासह संपूर्ण कोकण किनारपट्टीच्या भागात यंदा उन्हाच्या झळा तीव्र राहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात नेहमीप्रमाणेच तापमान सरासरीच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे.

हवामान विभागाकडून दरवर्षी पावसाळ्यासह उन्हाळी हंगामाचाही दीर्घकालीन अंदाज जाहीर केला जातो. मार्चच्या सुरुवातीपासून उन्हाळ्याचा हंगाम सुरू झाल्याने पहिल्याच दिवशी मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यांच्या किमान आणि कमाल तापमानाचा सरासरी अंदाज हवामान विभागाने सोमवारी जाहीर केला. गेल्या १६ वर्षांतील देशभरातील तापमानाचा अभ्यास करून तयार करण्यात आलेली शास्त्रीय पद्धती आणि यंदा फेब्रुवारीच्या सुरुवातीच्या वातावरणाची स्थिती लक्षात घेऊन हा अंदाज जाहीर करण्यात आला आहे.

उन्हाळ्यात राज्यात प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडय़ातील काही भागात तापमानाचा पारा उच्चांकी पातळीवर जात असतो. मध्य महाराष्ट्र आणि कोकणातही काही ठिकाणी उन्हाच्या झळा अधिक असतात.

विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात यंदा नेहमीप्रमाणेच सरासरीच्या आसपास तापमान राहणार आहे. मात्र, संपूर्ण कोकण विभागातील कमाल तापमान यंदा सरासरीपेक्षा वाढणार आहे. देशात छत्तीसगड, ओडिशा आणि गुजरातमध्येही तापमान सरासरीच्या तुलनेत अधिक राहणार आहे. उत्तर, उत्तर-पश्चिम आणि उत्तर पूर्व भारतातही अनेक ठिकाणी तापमानात वाढ होणार असल्याचे हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

राज्यालाही चटका..

कोरडे हवामान आणि उष्ण वाऱ्यांमुळे राज्यात बहुतांश भागांत तापमानाचा पारा अचानक वाढला असून, उन्हाचा चटका तीव्र झाला आहे. मध्य महाराष्ट्रातील सातारा आणि विदर्भातील चंद्रपूरमध्ये दिवसाचे कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसच्या जवळ पोहोचले आहे. मध्य महाराष्ट्रात पुणे, नाशिक, सोलापूर आदी भागांत किमान तापमान सरासरीच्या तुलनेत ३ ते ६ अंशांनी वाढले आहे. दिवसाचे कमाल तापमान ३६-३८ अंशावर गेल्याने उकाडा जाणवत आहे. कोकण विभागात मुंबई, रत्नागिरीतील कमाल आणि किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ झाली आहे. मराठवाडय़ातील औरंगाबाद, परभणी, विदर्भातील चंद्रपूर, अकोला, अमरावती, नागपूर, वाशिम वर्धा येथेही रात्र आणि दिवसाच्या तापमानात मोठी वाढ झाल्याने दिवसा उन्हाचा चटका आणि रात्री उकाडा जाणवतो आहे. सोमवारी चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी ३९.८ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.