डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाचा तपास उच्च न्यायालयाने केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपविला आहे. मात्र, वीस दिवस झाले तरी सीबीआयने तपास अद्याप ताब्यात घेतला नसला तरी या गुन्ह्य़ासंदर्भातील कागदपत्रांची जमवाजमव सुरू केली आहे. या गुन्ह्य़ाचा तपास मुंबई सीबीआयच्या गुन्हे अन्वेषण विभागाचे एक पथक करणार आहे.
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर २० ऑगस्ट २०१३ रोजी सकाळी गोळ्या झाडून डॉ. दाभोलकर यांची हत्या करण्यात आली होती. या गुन्ह्य़ाचा तपास पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेबरोबरच राज्यातील विविध तपास यंत्रणा करीत होत्या. यामध्ये विविध शक्यतांवर तपास केला जात होता. जात पंचायत, हिंदू संघटना, भोंदूबाबा, बोगस डॉक्टर यांच्याकडे चौकशी केली होती. पण, आरोपी काही सापडलेले नाहीत. डॉ. दाभोलकर यांच्यावर झाडण्यात आलेल्या गोळ्या आणि ठाणे येथील एका खंडणीच्या गुन्ह्य़ात अटक केलेले आरोपी मनीष नागोरी आणि विकास खंडेलवाल यांच्याकडे सापडलेल्या पिस्तुलाच्या बॅलेस्टीकचा अहवाल एक आला होता. त्या दोघांकडे सापडलेल्या पिस्तुलातून गोळ्या झाडण्यात आल्याचे अहवालात म्हटले होते. त्यावरून दोघांना अटक केली होती. पण, या दोघांवर पुणे पोलीस आरोपपत्र दाखल करू शकलेले नाहीत. त्यामुळे त्यांना या गुन्ह्य़ातून जामीन मंजूर झाला आहे.
या गुन्ह्य़ातील आरोपी सापडत नसल्यामुळे केतन तिरोडकर यांनी हा तपास सीबीआयकडे सोपविण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावरून उच्च न्यायालयाने डॉ. दाभोलकर यांच्या हत्येचा तपास सीबीआयकडे देण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, वीस दिवस झाले तरी तपास अद्याप सीबीआने ताब्यात घेतलेला नाही. या गुन्ह्य़ातील कागदपत्रे गोळा करण्याचे काम सुरू आहे. सीबीआय या गुन्ह्य़ात पहिल्यापासून मदत करीत होती. त्यामुळे गुन्ह्य़ाची बहुतांश माहिती असून लवकरच पुणे पोलिसांकडून तपास घेतला जाईल. हा तपास मुंबई सीबीआय गुन्हे शाखेचे एक पथक करणार आहे, अशी माहिती सीबीआय मधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.