26 February 2021

News Flash

मुंबईची दिवाळीतील हवा पुण्यापेक्षाही शुद्ध

लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी पुण्यात सर्वाधिक प्रदूषित हवा

(संग्रहित छायाचित्र)

मुंबईतील दिवाळीच्या दिवसातील हवा यंदा पुण्यापेक्षाही शुद्ध राहिल्याचे स्पष्ट झाले आहे. दिवाळीच्या दिवसांत मुंबईकरांनी पुणेकरांच्या तुलनेत फटाक्यांपासून होणारे उत्सर्जन कमी केले. त्याला सागरी हवेचीही साथ मिळाली. लक्ष्मीपूजनच्या दुसऱ्या दिवशी मुंबईत हवेतील प्रदूषणकारी अतिसूक्ष्म कणांची पातळी १०७ मायक्रॉन म्हणजेच ‘मध्यम’ होती. मात्र, पुण्यात ही पातळी ३०२ मायक्रॉन या ‘धोकादायक’ गटात गेली होती. नेहमीच्या तुलनेत पुण्यातील प्रदूषण दुप्पट झाले होते. पण, मुंबईत नेहमीपेक्षा कमी प्रदूषण नोंदविण्यात आले आहे.

केंद्र शासनाच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयांतर्गत ‘सफर’च्या वतीने शहरातील विविध ठिकाणी दररोज हवेच्या गुणवत्तेच्या नोंदी घेतल्या जातात. दिवाळीच्या दिवसांत प्रामुख्याने लक्ष्मीपूजन आणि त्यानंतरच्या दिवसांतील हवा प्रदूषणाकडे प्रामुख्याने लक्ष दिले जाते. पीएम २.५ आणि पीएम १० (पार्टिक्युलेट मॅटर) या अतिसूक्ष्म कणांचे हवेतील प्रमाण प्रामुख्याने तपासले जाते.

पीएम २.५ ची हवेतील पातळी १ ते ५० मायक्रॉन असल्यास स्थिती उत्तम समजली जाते.  ५० ते १०० समाधानकारक, १०० ते २०० मध्यम, २०० ते ३०० अतिशय वाईट स्थिती समजली जाते. ३०० मायक्रॉनच्या पुढील प्रमाण अतिधोकादायक समजले जाते.

मुंबईमध्ये १४ नोव्हेंबरला (लक्ष्मीपूजन) प्रदूषणकारी कणांची हवेतील पातळी केवळ ९० मायक्रॉन होती. दुसऱ्या दिवशी ती १०७ मायक्रॉनपर्यंत पोहोचली. पुण्यात १४ नोव्हेंबरला १२७ मायक्रॉन आणि दुसऱ्या दिवशी पहाटेपासूनच थेट ३०२ मायक्रॉनपर्यंत ही पातळी वाढली. पुण्यातील ही पातळी अतिशय वाईट ते धोकादायक गटातील होती. मुंबईत केवळ चेंबूर भागात प्रदूषित कणांची पातळी (२५७ मायक्रॉन) वाईट गटात होती.

मुंबईत यंदा फटाक्यांपासून कमी प्रमाणात उत्सर्जन झाले आणि या कालावधीत समुद्रातून वारेही वाहत असल्याने प्रदूषित कणांचे हवेतील प्रमाण कमी राहू शकल्याचे सफरने स्पष्ट केले आहे.

दिल्ली ‘अतिधोकादायक’च्याही पुढे

दिल्ली शहरामध्ये दिवाळीच्या दिवसांतील हवेतील प्रदूषणकारी कणांची पातळी अतिधोकादायक गटाच्याही पुढे नोंदविली गेले. १५ नोव्हेंबरला या ठिकाणी प्रदूषणकारी कणांची पातळी ४९० मायक्रॉनपर्यंत पोहोचली होती. टाळेबंदीच्या कालावधीत दिल्लीत ही पातळी १०० मायक्रॉनपर्यंत खाली आली होती. दिवाळीच्या पूर्वी थंडीतील वाढीबरोबरच ती ३२६ मायक्रॉनपर्यंत वाढली. दिवाळीत त्यात आणखी भर पडली आहे.

चेंबूरमध्ये प्रमाण वाढले: मुंबईत केवळ चेंबूर भागात प्रदूषित कणांची पातळी (२५७ मायक्रॉन) वाईट गटात होती. पुण्यात कात्रज (३४५ मायक्रॉन), हडपसर (३३४ मायक्रॉन) या भागांत धोकादायक पातळीवर प्रदूषण पोहोचले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 16, 2020 12:00 am

Web Title: mumbai diwali air is purer than pune abn 97
Next Stories
1 पुण्यात दिवसभरात १५३ नवे करोनाबाधित, चौघांचा मृत्यू
2 घरी सोडतो सांगून तरुणीला लॉजवर नेऊन बलात्कार, पुण्यातील धक्कादायक घटना
3 अयोध्येत २०० फूट खोदकाम करुनही खडक लागला नाही- स्वामी गोविंददेव गिरी महाराज
Just Now!
X