वाऱ्याच्या वेगाप्रमाणे धावणारी मुंबई – पुणे महामार्गावरील गाड्यांची वाहतूक आज सकाळी दहाच्या सुमारास काही वेळ मंदावली होती. महामार्गावरील अमृतांजन पुलाजवळ टेम्पोमधून आईस्क्रीमचे बॉक्स खाली कोसळल्याने एका मार्गिकेवरील वाहतूक काही काळासाठी बंद करावी लागली होती. रस्त्यावरील आईस्क्रीम हटवल्यानंतर या महामार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू करण्यात आली.

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरून निघालेल्या टेम्पोमधील आईस्क्रीमचे काही बॉक्स खाली कोसळले. त्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत होऊन पुण्याकडे येणाऱ्या एका मार्गिकेवरील वाहतूक बंद होती. तर इतर दोन मार्गिकांवरील वाहतूक सुरू ठेवण्यात आली होती. अमृतांजन पुलाजवळ सकाळी दहाच्या सुमारास ही घटना घडली.

वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टेम्पोमधून आईस्क्रीमचे बॉक्स खाली कोसळले. रस्त्यावर आईस्क्रीम वितळले होते. अपघात होऊ नये, यासाठी पोलिसांनी पुण्याच्या दिशेकडील एका मार्गिकेवरील वाहतूक अर्ध्या तासासाठी बंद करण्यात आली होती. आईस्क्रीम बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली. या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. तिन्ही मार्गिका वाहतुकीसाठी खुल्या करण्यात आल्या असून, वाहतूक सुरळीत झाली आहे.