द्रुतगती महामार्गावरील अपघाताची कारणे शोधण्याच्या पोलिसांना सूचना

द्रुतगती मार्गावर गेल्या काही दिवसांमध्ये झालेले चार अपघात केवळ मानवी चुकांमुळे झाल्याचा निष्कर्ष राज्य महामार्ग पोलिसांनी काढला असून सरळसोट रस्त्यावर देखील मोटारीवरील नियंत्रण सुटून चालकांकडून घडलेले अपघात ‘संशयास्पद’ असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे प्रत्येक अपघातामागचे कारण शोधा, अशी सूचना महामार्ग पोलिसांनी सर्व पोलिस ठाण्यांना केली आहे. अपघात घडल्यानंतर चालक जखमी झाला असेल, तरी त्याची वैद्यकीय तपासणी करा. तसेच अपघात मृत्युमुखी पडलेल्या चालकाचे शवविच्छेदन करण्यापूर्वी त्याने मद्य किंवा अमली पदार्थाचे सेवन केले का, याची तज्ज्ञांमार्फत खातरजमा करा, अशा सूचना  पोलिसांनी  केल्या आहेत.

द्रुतगती मार्गावर सहा विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्यानंतर महामार्ग पोलिसांच्या अखत्यारीतील पुणे, अहमदनगर, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली, बीड, उस्मानाबाद, जालना यांसह अकरा जिल्ह्य़ांमधील पोलीस मदत केंद्रांवरील (टॅप) अधिकाऱ्यांची बैठक पुण्यात आयोजित करण्यात आली होती. पुणे विभागातील अकरा जिल्ह्य़ांत महामार्ग पोलिसांची २१ मदत केंद्रे आहेत. त्या केंद्राच्या अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या. ज्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अपघात घडला आहे, अशा पोलीस ठाण्यांमधील अधिकाऱ्यांना महामार्ग पोलिसांकडून पत्र देण्यात आले आहे. महामार्गावर अपघात घडल्यानंतर चालक जखमी झाला असेल, तर त्याच्यावर प्राथमिक उपचार करून त्याला सोडून न देता त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात यावी. त्याने मद्य किंवा अमली पदार्थाचे सेवन केले होते का, याची पडताळणी करण्यात यावी तसेच अपघातात चालक मृत्युमुखी पडला असेल, तर त्याचे शवविच्छेदन करण्यापूर्वी वैद्यकीय शंका (मेडिकल क्वेरी) उपस्थित करण्यात यावी. त्यामुळे मृत चालकाने मद्य किंवा अमली पदार्थाचे सेवन केले होते का, याची माहिती उपलब्ध होईल, असे राज्य महामार्ग पोलिसांच्या पुणे विभागाचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर गेल्या महिन्यात २६ जुलै रोजी  कामशेत बोगद्याजवळ मोटारीवरील नियंत्रण सुटल्याने पहाटे सहा विद्यार्थी मृत्युमुखी पडल्याची घटना घडली होती. त्यापूर्वी द्रुतगती मार्गावर झालेले तीन अपघात मोटारचालकांचे नियंत्रण सुटून झाले होते. महामार्ग पोलिसांनी त्या अपघातस्थळांची पाहणी देखील केली. ज्या ठिकाणी हे अपघात झाले होते तेथील रस्ता सरळ होता. तेथे अवघड वळण देखील नव्हते. मोटार दुसऱ्या वाहनावर देखील आदळली नव्हती, असे निरीक्षण तांबे यांनी नोंदविले.