मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गावर अमृतांजन पुलाजवळ कंटेनरमधील तीन कॉईल मार्गावर पडल्याचा प्रकार आज (शनिवार) सकाळी साडेपाचच्या सुमारास घडला. तसंच यावर मागून येणाऱ्या ट्कची धडक बसल्याने अपघात झाला. त्यामुळे पुण्याच्या दिशेने येणाऱ्या मार्गावर पाच किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत अशी माहिती वाहतूक पोलिसांनी दिली आहे. आज शनिवार असल्याने पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे साडेपाचच्या सुमारास पुण्याच्या दिशेने येणाऱ्या कंटेंनरमधून तीन अवजड कॉईल अचानक मार्गावर कोसळल्या. यातील एक कॉईलला पाठीमागून येणाऱ्या ट्रकने धडक दिली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. परंतु यामुळे तब्बल तीन तास वाहतूक कोंडी झाली होती.

दरम्यान, वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यानी सकाळी पावणे आठच्या सुमारास वाहतूक थांबवून अवजड कॉईल बाजूला घेतल्या. यासाठी पाऊण तास पुण्याच्या दिशेने येणारी वाहतूक थांबविण्यात आली होती. यामुळे वाहनांच्या पाच किलोमीटर रांगा लागल्या. बॅकलॉग भरून येण्यासाठी काही वेळ लागेल असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. पुण्याच्या दिशेने येणारी वाहतूक ही सध्या कासवगतीने सुरू आहे.