वाहनांची संख्या वाढल्यामुळे तसेच रस्त्यात ट्रक उलटल्याने कोंडी
उन्हाळी सुटी आणि मे महिन्यातील शनिवार व रविवारच्या निमित्ताने शनिवारी लोणावळ्यात मोठया संख्येने आलेल्या पर्यटकांमुळे शनिवारी सकाळपासूनच पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर आडोशी बोगदा ते अमृतांजन पूल दरम्यान मोठी कोंडी होऊन तीन ते चार किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतुकीची ही कोंडी कायम असतानाच संध्याकाळी खंडाळा एक्झिट पॉईंट येथे ट्रक उलटल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे या मार्गावरील वाहतुकीचा दिवसभर विचका झाला. त्यातून वाहनचालकांची प्रचंड गैरसोय झाली.
उन्हाळी सुटीतील शनिवार व रविवारच्या निमित्ताने लोणावळ्यातील पर्यटनासाठी निघालेल्या नागरिकांची वाहने मोठय़ा प्रमाणावर सकाळपासूनच द्रुतगती मार्गावर आली होती. कोणताही अडथळा नसतानाही केवळ वाहनांची संख्या वाढल्याने वाहतूक संथगतीने सुरू झाली. हे चित्र दिवसभर कायम होते. संथगतीच्या वाहतुकीमुळे या रस्त्यावर दिवसभर वाहतूक कोंडी कायम होती. द्रुतगती मार्गाप्रमाणेच लोणावळ्यात पर्यटकांनी मोठया संख्येने गर्दी केल्यामुळे शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर दुतर्फा गर्दी झाली होती.
दिवसभर या मार्गावर वाहतूक कोंडीचा सामना वाहनचालक करीत असतानाच संध्याकाळी पाचच्या सुमारास खंडाळा एक्झीट पॉईंट येथील उतारावर एक ट्रक रस्ता दुभाजकाला धडकून उलटला, त्यामुळे मुंबईकडे जाणारा मार्ग तासभर पूर्णपणे ठप्प झाला. त्यामुळे जवळपास चार किलोमीटर अंतरापर्यत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. द्रुतगतीवरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वलवण येथून द्रुतगतीवरील वाहतूक राष्ट्रीय महामार्गावर वळविल्याने लोणावळ्यातही जवळपास तीन किलोमीटपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याने शहरातील वाहतूकही कोलमडली. सव्वासहाच्या सुमारास ट्रक व त्यामधील रस्त्यावर पसरलेली पोती बाजूला करुन वाहतूक सुरू करण्यात आली. मात्र वाहतूक पूर्वपदावर येण्यास रात्रीचे आठ वाजले होते.
ट्रक उलटल्याची माहिती दिल्यानंतर तब्बल एक तासाने आयआरबीची क्रेन व जेसेबी मशिन पोहोचले. त्यामुळे अपघातग्रस्त वाहन बाजूला करण्यास उशीर झाला. शनिवारी सकाळपासून मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या मार्गिकेवर वाहतूक कोंडी होती. त्यानंतर सायंकाळी मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर वाहतूक कोंडी झाल्याने संपूर्ण दिवसच वाहतूक कोंडीचा ठरला. वाहनचालकांना त्यामुळे प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. या मार्गावर वाहनांची संख्या वाढली की वाहतूक कोंडी होते. तसेच अपघात झाला की वाहतूक कोंडी होते. साधा एखादा ट्रेलर अथवा ट्रक बंद पडला तरी वाहतूक कोंडी होते. त्यामुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला खरेच द्रुतगती म्हणायचे का, असा प्रश्न विचारला जात आहे.

एसटीच्या वाहतुकीलाही फटका
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर शनिवारी दिवसभर झालेल्या वाहतुकीच्या कोंडीचा फटका एसटीच्या गाडय़ांना व प्रवाशांनाही बसला. अनेक गाडय़ा दिवसभर कोंडीत अडकून पडल्या होत्या. त्यामुळे ठाणे, दादर, डोंबिवलीकडे जाणाऱ्या गाडय़ांना पुण्यात पोहोचण्यास व पुण्याहून मुंबईकडे जाण्यास उशीर होत होता. द्रुतगतीवरून जाणाऱ्या एसटीच्या सर्वच गाडय़ा दोन तास उशिराने धावत होत्या.