महामार्ग पोलिसांकडून कारवाईचा इशारा; पावसाळय़ात पर्यटकांच्या गर्दीत वाढ

पावसाळा सुरू झाल्यानंतर लोणावळा, खंडाळा परिसरात राज्याच्या वेगवेगळय़ा भागांतून मोठय़ा संख्येने पर्यटक गर्दी करतात. पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अनेक जण चारचाकी वाहने थांबवितात. द्रुतगती मार्गावर वाहने थांबविल्यामुळे गंभीर स्वरूपाचे अपघात होण्याची शक्यता असल्यामुळे पर्यटकांना द्रुतगती मार्गावर वाहने थांबविण्यास मज्जाव करण्यात आला आहे. द्रुतगती मार्गावर वाहने थांबविल्यास कारवाई करण्याचा इशारा राज्य महामार्ग पोलिसांकडून देण्यात आला आहे.

पावसाळय़ात लोणावळा, खंडाळा परिसरातील डोंगररांगांतून येणारे धबधबे, हिरवाईने नटलेला परिसर पाहण्यासाठी पर्यटकांची अक्षरश: झुंबड उडते. त्यामुळे लोणावळा शहर तसेच ग्रामीण भागात पोलिसांना आठवडय़ातील शनिवार आणि रविवारी या दोन दिवशी विशेष बंदोबस्त ठेवावा लागतो. पावसाळय़ात मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक वाढते. दरडी कोसळण्याची भीती तसेच वाहतूक विचारात घेऊन राज्य महामार्ग पोलिसांना वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात.

द्रुतगती मार्गावर पर्यटक मोटारी, मिनी बस थांबवितात. द्रुतगती मार्गावरील मार्गिकेलगत वाहने थांबविल्यामुळे पाठीमागून येणाऱ्या वाहनांचा वेग कमी होतो. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता असते, तसेच पाठीमागून येणाऱ्या वाहनचालकाकडून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पाश्र्वभूमीवर पावसाळय़ात द्रुतगती मार्गावर वाहने थांबविणाऱ्या चालकांविरुद्ध कारवाई करण्यासाठी पोलिसांकडून विशेष मोहीम (नो व्हॉल्टिंग) हाती घेण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य महामार्ग पोलीस दलातील अधिकाऱ्यांनी दिली.

द्रुतगती मार्गावर कामशेत, लोणावळा, खंडाळा परिसरात ज्या ठिकाणी पर्यटक वाहने लावतात, त्या ठिकाणची पाहणी महामार्ग पोलिसांकडून करण्यात आली आहे. या भागात वाहने थांबविण्यास मनाई आहे, असे फलक लावण्यात येणार आहेत. हे फलक लावण्याची सूचना द्रुतगती मार्गाची देखभाल करणाऱ्या ‘आयआरबी ’ कंपनीला देण्यात आली आहे.

द्रुतगती मार्गावरील पाच ठिकाणी विशेष लक्ष

पावसाळय़ात द्रुतगती मार्गावरील कामशेत बोगदा, पवना चौकी, ओझर्डे, ताजे पेट्रोल पंप, खंडाळा परिसरात पर्यटक वाहने थांबवितात. पोलिसांकडून या पाच ठिकाणी वाहने न थांबविण्याची सूचना करण्यात आली आहे. तेथे फलक लावण्यात येणार आहेत. उत्साहाच्या भरात पर्यटक नियमभंग करतात. काही वाहनचालक मद्य पिऊन वाहने चालवितात. भरधाव वाहने चालविणे तसेच मार्गिका सोडून वाहन चालविणाऱ्या (लेनकटिंग) वाहनचालकांवर कारवाई करण्यात येणार आहे.

घाटक्षेत्रात कोंडी न होण्यासाठी उपाययोजना

द्रुतगती मार्गावर पावसाळय़ात वाहतूक संथगतीने सुरू असते. त्यामुळे घाटक्षेत्रात कोंडी होण्याची शक्यता असते. खोपोली, लोणावळा हे घाटक्षेत्रातील मार्ग दहा ते बारा किलोमीटरचे आहेत. पोलिसांकडून घाटक्षेत्रात दहा ठिकाणी दिवसा आणि रात्री बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. घाटक्षेत्रात एखाद्या वाहनाचा अपघात झाल्यास तेथील कोंडी दूर करणे, वाहतूक वळविणे, आयआरबीकडून क्रेन मागविणे अशी कामे तातडीने केली जातात. घाटक्षेत्रातील कोंडी काही वेळात हटविण्यात येते. यापूर्वी घाटक्षेत्रात कोंडी झाल्यास द्रुतगती मार्गावरील वाहतूक ठप्प व्हायची. राज्य महामार्ग पोलीस दलाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आर. के. पद्मनाभन यांच्या सूचनेनंतर या भागातील कोंडी दूर करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले आहेत.