मुंबई- पुणे राष्ट्रीय महामार्गावर लोणावळयात अपघातांना कारणीभूत ठरणाऱ्या धोकादायक एसटीबस थांब्यांवर कारवाईची मागणी वारंवार होऊनही कोणतीही शासकीय यंत्रणा कारवाई करत नसल्याने या धोकादायक थांब्यांना नेमके कोणाचे अभय आहे असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

लोणावळा शहरात राष्ट्रीय महामार्गाच्या लगत गवळीवाडा नाका येथे एसटीचे मोठे बस स्थानक असताना मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर वळवण गावाच्या हद्दीत हॉटेल एनएच ०४ येथे एसटीला खासगी थांबा देण्यात आला आहे. या ठिकाणी २० साध्या गाडय़ा, ४० निमआराम गाडय़ा आणि ७२ वातानुकूलित गाडय़ा अशा १३२ गाडय़ांना थांबण्याची अधिकृत परवानगी एसटी महामंडळाने दिली असली तरी येथे प्रत्यक्षात ३०० हून अधिक गाडय़ा दररोज थांबत असल्याने एसटीचे अधिकृत बस स्थानक ओस पडत आहे आणि खासगी थांब्यावर गाडय़ा उभ्या करण्यासाठी जागा शिल्लक राहात नसल्याचा विरोधाभास लोणावळयात पाहायला मिळत आहे.

या खासगी थांब्याच्या शेजारी हॉटेल सेंटर पॉइर्ंट नावाचे हॉटेल आहे. एसटीच्या कागदोपत्री येथे थांबा नसतानाही सर्व शिवनेरी गाडय़ा आणि अन्य एसटी गाडय़ा येथे सर्रासपणे उभ्या केल्या जातात. या हॉटेलच्या बाहेर एसटीचा अधिकृत थांबा असा बोर्ड लावण्यात आला आहे. मात्र लोणावळयात सेंटर पॉइर्ंट नावाचा कोणताही हॉटेल थांबा देण्यात आला नसल्याचे एसटी महामंडळाच्या जनसंपर्क कक्षातून सांगण्यात आले. तसेच या दोन्ही थांब्यांवर परवाना दिलेल्या एसटीच्या वाहनांव्यतिरिक्त जादा गाडया थांबत असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना देखील मुंबई व पुणे विभाग नियंत्रण कक्षाला दिल्या असल्याची माहिती जनसंपर्क विभागाचे अधिकारी बी. बी. पाटील यांनी दिली. मात्र एसटी नियंत्रण कक्षाकडून या बाबत सर्रास डोळेझाक सुरू आहे.

लोणावळा शहरात एसटीचे अधिकृत बस स्थानक आहे. तसेच, द्रुतगती महामार्गाने प्रवास करणाऱ्या वातानुकूलित व निम आराम गाडय़ांसाठी उस्रे व खालापूर येथे थांबे देण्यात आले असताना लोणावळयात नव्याने खासगी थांबे देण्यामागचे नेमके प्रयोजन काय याबाबत चर्चा सुरू आहे. हॉटेल एनएच ०४ या खाजगी बस थांब्यात एसटीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याची भागीदारी असल्याचा आरोप लोणावळा भारतीय जनता पक्षाने केला आहे.  या थांब्यावर एसटीच्या गाडय़ा थांबत असताना देखील एसटी महामंडळ नियंत्रण कक्ष त्यावर कारवाई का करत नाही, असाही प्रश्न भाजपने विचारला आहे. हे हॉटेल लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीत असतानादेखील ते कुसगाव ग्रामपंचायत हद्दीत असल्याचे दर्शवत संबंधितांनी गेल्या १७ वर्षांपासून नगरपरिषदेचा कर बुडविला असल्याचाही आरोप भाजपने केला आहे.

या हॉटेलच्या अर्धा किमी अंतरावर लोणावळा महाविद्यालयाच्या समोर नीता व्होल्वो बसचा थांबा राष्ट्रीय महामार्गावरच आहे. येथेही मोठया प्रमाणात  महामार्गावरच गाडय़ा उभ्या केल्या जात असल्याने सतत अपघात होत आहेत. मनशक्ती केंद्र ते हॉटेल मुनिर दरम्यान राष्ट्रीय महामार्ग एकेरी असतानाही या मार्गावर दोन अधिकृत व एक अनधिकृत बस थांबे देण्यात आल्याने अपघाताच्या संख्येत वाढ झाली आहे.

एसटीच्या दोन्ही थांब्यांवर परवाना दिलेल्या एसटी गाडय़ांच्या व्यतिरिक्त जादा गाडय़ा थांबत असतील तर त्यांच्यावर कारवाई करावी अशा सूचना मुंबई व पुणे विभाग नियत्रंण कक्षाला देण्यात आल्या आहेत.

बी. बी. पाटील, जनसंपर्क विभाग अधिकारी, परिवहन मंडळ