|| सुशांत मोरे

पावसामुळे मंकी हिल ते नागनाथ दरम्यान कामाला विलंब :- यंदा पावसामुळे मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरील विस्कळीत झालेली सेवा पूर्ववत होण्यासाठी आणखी दोन महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. लांबलेल्या पावसामुळे या मार्गावरील मोठा फटका बसलेल्या मंकी हिल ते नागनाथ पट्टय़ातील कामाला विलंब झाला आहे. त्यामुळे मुंबई पुणे मार्गावरील सेवा प्रत्यक्षात १५ जानेवारी, २०२० नंतरच सुरळीत होईल, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली.

पावसामुळे मुंबई ते पुणे रेल्वे मार्गाला काही ठिकाणी मोठा फटका बसला. रुळ उखडले, रुळाखालील खडी वाहून गेली, सिग्नल बिघाडासह अनेक समस्यांचा सामना करावा लागला. मंकी हिल ते नागनाथ पट्टय़ात रुळावरूनही पाणी वाहून गेले. येथील जमीन खचली. येथे जवळच असलेल्या १५० मीटर पुलाशीही संपर्क तुटला. त्यामुळे मध्य रेल्वेसमोर या पट्टय़ात सीएसएमटीच्या दिशेने जाणारा तिसरा मार्ग बंद करण्याशिवाय पर्याय राहिला नाही. ३ ऑक्टोबर २०१९ पासून येथील तिसरा मार्ग बंद ठेवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला. त्यामुळे अन्य उपलब्ध दोन मार्गिकांवर भार पडला. परिणामी ३० नोव्हेंबपर्यंत एक्स्प्रेस गाडय़ांचे वेळापत्रक काहीसे विस्कळीतच राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते.

यंदा ५ नोव्हेंबपर्यंत पाऊस लांबला. त्याचा फटका मध्य रेल्वेकडून केल्या जाणाऱ्या कामावर झाला. लांबलेल्या पावसामुळे कामालाही विलंब झाला. अखेर ६ नोव्हेंबरपासून मंकी हिल ते नागनाथ पट्टय़ातील कामाला हळूहळू सुरुवात झाली. हे काम पूर्ण होण्यासाठी १५ जानेवारी उजाडणार असून त्यानंतरच रेल्वे सेवा पूर्ववत होईल, अशी माहिती मध्य रेल्वेचे अपर विभागीय व्यवस्थापक (इन्फ्रास्ट्रक्चर) आशुतोष गुप्ता यांनी दिली. त्यामुळे या मार्गावरील मेल-एक्स्प्रेस सेवा विस्कळीतच राहणार आहे.

तिसरा मार्ग बंद

नागनाथ ते मंकी हिल पट्टय़ात सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या या तिसऱ्या अप मार्गावर दररोज ३० मेल-एक्स्प्रेस धावतात. मात्र सुरू असलेल्या कामामुळे २७ मेल-एक्स्प्रेस उपलब्ध असलेल्या जवळच्या दोन मार्गावरून आणि अन्य मार्गावरून वळवण्यात आल्या आहेत. त्यामुळे उर्वरित दोन मार्गावर ताण वाढला असून वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. तीन एक्स्प्रेस रद्दही केल्या असून १५ जानेवारीपर्यंत हीच स्थिती राहील.

मुंबई ते पुणे रेल्वे मार्गावर पावसाचा सर्वात जास्त फटका खंडाळा ते मंकी हिल, ठाकूरवाडी ते मंकी हिल आणि मंकी हिल ते नागनाथ पट्टय़ात बसला. यातील मंकी हिल ते नागनाथ पट्टा सोडला तर अन्य ठिकाणी कामे पूर्ण करण्यात आली आहेत. या भागातील कामांसाठी १० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. ही मार्गिका १९८४ साली बनली आहे.