मुंबई – पुणे रेल्वेमार्गावर लोणावळा येथील मंकी हिल परिसरात रुळावर दरड कोसळल्याची घटना घडली. मंकी हिल येथील मिडल लाईनवर दुपारी बाराच्या सुमारास दरड कोसळली असून एक्स्प्रेसच्या चालकाला हा प्रकार लक्षात आला आणि त्याने वेळीच ब्रेक दाबला. त्यामुळे मोठा अपघात टळला आहे.
मंकी हिल परिसरात शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास रेल्वे रुळावर दरड कोसळली. काही वेळातच तिथून एक एक्स्प्रेस जाणार होती. एक्स्प्रेसच्या चालकाला हा प्रकार लक्षात येताच त्याने ब्रेक दाबला आणि एक्स्प्रेस थांबवली. यामुळे मोठा अनर्थ टळला. रेल्वेचे पथक घटनास्थळी पोहोचले असून रुळावरील दगड बाजूला करण्याचे काम सुरु आहे.
पावसाळ्यात किंवा अन्य वेळीही लोणावळा ते कर्जत या मध्य रेल्वेच्या हद्दीत अनेक वेळा दरड कोसळण्याच्या घटना घडतात. यात रुळावर आलेल्या मोठ्या दगडांमुळे मेल-एक्सप्रेस गाडय़ांची सेवा एक किंवा दोन दिवस ठप्प होते. यामुळे प्रवाशांनाही धोका पोहोचू शकतो. त्यामुळे या घटना रोखण्यासाठी रेल्वे प्रशासन कधी उपाययोजना राबवणार असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 24, 2018 1:37 pm