करारानुसार टोलवाढीचे नियोजन २०२३ पर्यंत

टोलमाफीची आश्वासने दिली जात असतानाही पुणे- मुंबई द्रुतगती मार्गासह राष्ट्रीय महामार्गावर नागरिकांवर टोलवाढीचा बोजा टाकण्यात येत असून, विशेष म्हणजे यंदा होणारी टोलवाढ मागील बारा वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. टोलबाबत ठेकेदाराशी झालेला करार २०१९ पर्यंतचा असला, तरी टोलवाढीबाबत करारामध्ये सन २०२३ पर्यंतचे नियोजन करण्यात आले आहे.

द्रुतगती मार्ग व राष्ट्रीय महामार्गावरील टोलच्या दरामध्ये १ एप्रिलपासून १८ टक्के वाढ करण्यात येणार आहे. करारानुसार प्रत्येक तीन वर्षांनंतर दरवाढीचे टप्पे ठरविण्यात आले आहेत. द्रुतगती मार्गावर २००२ पासून टोल आकारणीला सुरुवात करण्यात आली. मोटारींसाठी १०० रुपये, तर हलक्या वाहनांसाठी १५५ रुपयांपासून टोल आकारणी सुरू करण्यात आली होती. १ एप्रिल २००५ मध्ये पहिली टोलवाढ करण्यात आली. त्यात मोटारींचा टोल १८ रुपयांनी, तर हलक्या वाहनांच्या टोलमध्ये २८ रुपयांची वाढ करण्यात आली होती.

द्रुतगती मार्गावर २००५ नंतर एप्रिल २००८, २०११, २०१४ अशी त्रवार्षिक दरवाढ करण्यात आली. त्यावेळी मोटारीच्या टोलमध्ये अनुक्रमे २२, २५ आणि ३० रुपये, तर, हलक्या वाहनांच्या टोलमध्ये अनुक्रमे ३३, ३९, ४५ रुपयांची टोलवाढ करण्यात आली होती. १ एप्रिलपासून होणारी टोलवाढ ही मोटारींसाठी ३५ रुपये, तर हलक्या वाहनांसाठी ५५ रुपयांची असणार आहे. पुढची टोलवाढ करायची झाल्यास ती मोटारींसाठी ४० रुपये आणि हलक्या वाहनांसाठी ६५ रुपयांची असेल. द्रुतगती मर्गासह राष्ट्रीय मार्गावरही यंदाची टोलवाढ मोठी आहे. टोल सुरू होताना महामार्गावर मोटारींसाठी ६२ रुपये टोल होता. आजवर प्रत्येक टप्प्यात ३ ते १४ रुपये टोलवाढ झाली. यंदा ही टोलवाढ १६ रुपयांची आहे. त्यामुळे द्रुतगतीवर मोटारींसाठी १०० रुपयांपासून सुरू झालेला टोल आता २३० रुपयांवर, तर राष्ट्रीय महामार्गावर मोटारींसाठी १६ रुपयांपासून सुरू झालेला टोल ११७ रुपयांवर पोहोचला आहे.

पुणे- मुंबई एसटीचे तिकीट महागणार

पुणे- मुंबई द्रुतगती मार्ग आणि राष्ट्रीय महामार्गावरील टोलच्या दरांमध्ये १ एप्रिलपासून वाढ होणार असल्याने एसटीचे तिकीटही महागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. द्रुतगती मार्गावर एसटीच्या गाडय़ांसाठी सुरुवातीचा टोल २४० रुपये होता. तो सध्या ४६५ रुपये झाला आहे. १ एप्रिलपासून त्यात ९५ रुपयांची वाढ होणार असून, एसटीच्या गाडीला आता ५५० रुपये टोल भरावा लागेल. राष्ट्रीय महामार्गावर एसटीसाठी सध्याचा टोल ३५५ रुपये आहे. त्यात ५६ रुपयांची वाढ होणार आहे.