पुण्यासह मुंबईमध्ये गेल्या आठवडाभरापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून रेल्वेने पुणे-मुंबई धावणाऱ्या डेक्कन क्वीन, इंटरसिटी, सिंहगड आणि इंद्रायणी एक्स्प्रेस या गाडय़ा रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही गाड्या मनमाड मार्गे वळवण्यात आल्या आहेत. मंगळवारी पुणे आणि मुंबई दरम्यान धावणाऱ्या सर्व रेल्वे पावसामुळे रद्द करण्यात आल्या होत्या. पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या रेल्वे गाड्या सुरळीत होण्यासाठी आणखी दोन दिवस लागतील असा अंदाज मध्य रेल्वेनं व्यक्त केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून पुणे, मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे मुंबई आणि उपनगरांमध्ये अनेक ठिकाणी रेल्वे रूळ पाण्याखाली गेले आहेत. काही रेल्वे स्थानकांमध्येही पाणी साचले आहे. अनेक ठिकाणी रेल्वे रूळाला तडेही गेले आहेत. कर्जत-लोणावळा आणि बदलापूर-कर्जत दरम्यान दरड कोसळल्या आहेत. या परिस्थितीत गाडय़ा सोडणे धोक्याचे ठरू शकते, त्यामुळे रेल्वे प्रशासनाने दोन्ही बाजूने गाडय़ा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. याबरोबरच बुधवारी (७ ऑगस्ट) पुणे-एर्नाकुलम एक्स्प्रेस आणि शुक्रवारी (९ ऑगस्ट) एर्नाकुलम-पुणे एक्स्प्रेस या गाडय़ाही रद्द करण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

दरम्यान, नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी पुणे रेल्वे स्थानकात प्रवाशांची गर्दी झाली होती. मात्र, सकाळच्या सत्रातील पुण्यातून मुंबईकडे जाणाऱ्या सर्वच गाडय़ा रद्द करण्यात आल्याने प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. त्यामुळे अनेकांना एसटी गाडय़ा, खासगी वाहनांनी प्रवास करावा लागला.

पुणे-मुंबई मार्गावरील वाहतूक सुरळीत

पुणे-मुंबई मार्गावरील गेल्या काही दिवसांपासून विस्कळीत झालेली रस्ते वाहतूक मंगळवारी सुरळीत झाली. पुण्याहून ठाणे, बोरिवली आणि दादरसाठी रवाना झालेल्या गाडय़ा, तसेच ठाणे, बोरिवली, दादर येथून पुण्यासाठी रवाना झालेल्या एसटी गाडय़ा विहित कालावधीत दाखल आल्या. रेल्वे गाडय़ा रद्द झाल्याने एसटी गाडय़ांना गर्दी वाढली होती. त्यामुळे प्रवाशांच्या मागणीनुसार पुण्यातून मुंबईकडे जादा गाडय़ा सोडण्यात आल्या आहेत.