मुंबई-पुणे इंटरसिटी उद्याही धावणार नाही
मुंबईत होत असलेल्या जोरदार पावसामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीवरही परिणाम झाला असल्याने २१ सप्टेंबरला पुणे- मुंबई सिंहगड एक्स्प्रेस, इंटरसिटी एक्स्प्रेस आणि मुंबई- पुणे डेक्कन एक्स्प्रेस या गाडय़ा रद्द करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे २२ सप्टेंबरला मुंबई- पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस धावणार नसल्याचे मध्य रेल्वेकडून कळविण्यात आले आहे.
मुंबईत दोन दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे मुंबई विभागातील रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. काही गाडय़ा मुंबईतून धावू शकल्या नाहीत, तर काही एक्स्प्रेस गाडय़ा मुंबईत जाऊ शकणार नसल्याने त्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सिंहगड, इंटरसिटी, डेक्कन एक्स्प्रेस या गाडय़ांचा त्यात समावेश आहे. गाडय़ा रद्द करण्याबरोबरच पुणे- भुसावळ या गाडीचा मार्ग २१ सप्टेंबरला बदलण्यात येणार आहे. ही गाडी दौंड, मनमाड या मार्गाने सोडण्यात येईल. इतर सर्व गाडय़ा त्यांच्या नियोजित वेळेत धावतील, असे मध्य रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मुंबईत २९ ऑगस्टला झालेल्या जोरदार पावसानंतरही तीन ते चार दिवस पुणे- मुंबई रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती, तेव्हाही अनेक गाडय़ा रद्द कराव्या लागल्या होत्या. त्यानंतर खंडाळा घाटाजवळ मालगाडीचे डबे घसरल्याने दोन दिवस रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. या अपघातानंतर त्याच ठिकाणी लोहमार्गाच्या दुरुस्तीचे काम काढण्यात आल्याने एक दिवस पुणे- मुंबई दरम्यानच्या काही गाडी रद्द करण्यात आल्या होत्या. मागील तीन आठवडय़ांपासून पुणे- मुंबई दरम्यानच्या गाडय़ा रद्द होण्याची हा चौथा प्रकार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 21, 2017 4:04 am