News Flash

प्रभागाचे प्रगतिपुस्तक : मुंढव्यातील उड्डाण पूल निरूपयोगी

मुंढवा-मगरपट्टा सिटी या प्रभागातील वाहतूक कोंडी सोडविण्याच्या दृष्टीने उड्डाणपुलांच्या कामांना प्राधान्य देण्यात येत असले, तरी रस्ता रुंदीकरणाची कामे रखडली आहेत.

मुंढवा परिसरात कचरा आणि राडारोडा अस्ताव्यस्त पद्धतीने टाकला जातो.

नगरसेवक – चेतन तुपे, हेमलता मगर, पूजा कोद्रे, सुनील गायकवाड

प्रभाग – मुंढवा-मगरपट्टा सिटी प्रभाग क्रमांक- २२

अविनाश कवठेकर, लोकसत्ता

पुणे : मुंढवा-मगरपट्टा सिटी या प्रभागातील वाहतूक कोंडी सोडविण्याच्या दृष्टीने उड्डाणपुलांच्या कामांना प्राधान्य देण्यात येत असले, तरी रस्ता रुंदीकरणाची कामे रखडली आहेत. चंदननगर बाह्य़वळण मार्गे नदीवर पुलाची उभारणी करण्यात आली आहे. मात्र रस्ता रुंदीकरणात येत असलेल्या काही झोपडपट्टय़ांमुळे रस्ता रुंदीकरण रखडले आहे. त्यामुळे पुलाचा वापर होत नसल्याचे चित्र या प्रभागात आहे.

महापालिके च्या मुंढवा-मगरपट्टा सिटी हा प्रभाग क्रमांक २२ मिश्र लोकवस्तीचा प्रभाग आहे. या प्रभागात ३५० ते ४०० सोसायटय़ा असून मध्यमवर्ग येथे मोठय़ा प्रमाणावर आहे. प्रभागात पाच ते सात झोपडपट्टय़ांचाही समावेश आहे. वाहतूक कोंडी, कचरा वर्गीकरणाची समस्या, पर्यायी

रस्ते, अतिक्रमणे, बेशिस्त वाहतूक असे नानाविध प्रश्न या प्रभागात आहेत. या प्रभागातील चारही नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत.

मुंढवा हा भाग मध्यमवर्गीयांच्या वसाहतीचा तर मगरपट्टा सिटी उच्चभ्रू नागरिकांचे वास्तव्य असलेला असा भाग आहे. त्यामुळे विकास कामातही काही प्रमाणात असमतोल जाणवतो. मगरपट्टा सिटी भागातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्राधान्य देण्यात येत आहे, असा आरोपही स्थानिक नागरिकांकडून करण्यात येतो. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वडगावशेरीहून चंदननगर बाह्य़वळण मार्गे नदीवर पूल उभारण्यात आला आहे. या पुलाचा वापर व्हावा, यासाठी रस्ता रुंदीकरण प्रस्तावित होते. मात्र रस्त्यावर काही ठिकाणी झोपडय़ा आहेत. त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निकाली निघालेला नाही. त्यामुळे रस्ता रुंदीकरणाची प्रक्रियाही ठप्प झाली आहे.

बाहेरील शहरातून खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाडय़ा रात्री-अपरात्री येतात. पार्किं गची सुविधा नसल्यामुळे सोसायटय़ांपुढेच या गाडय़ा लावल्या जातात. त्यातून रहिवाशांना त्रास होतो. मुळातच अंतर्गत रस्ते अपुरे आहेत. गाडय़ा लावल्यामुळे अंतर्गत रस्त्यांवर वाहतूक कोंडीही होते, अशी नागरिकांची तक्रार आहे. भाजी मंडईचे नूतनीकरणही रखडले आहे. नाटय़गृहाचे कामही संथ गतीने सुरू आहे. प्रशस्त रस्ते, मोठे आणि मोकळे पदपथही या प्रभागात अभावानेच आहेत. बेबी कालवा परिसरात राडारोडा आणि कचरा फे कला जातो. बेबी कालव्यावरील काही भाग बंदिस्त के ल्यास त्यावरून वाहतूक सुरू करण्याचे नियोजन करता येईल आणि वाहतुकीचा ताणही कमी होईल, अशी मागणीही नागरिकांकडून होत आहे.

प्रभागाचा भौगोलिक विस्तार लक्षात घेता अनेक भागात पुरेशी स्वच्छतागृहे नाहीत. ज्या भागात स्वच्छतागृहे आहेत, त्यांची दुरवस्था झाली असून नियमित देखभाल दुरुस्तीही होत नाही, अशी नागरिकांची तक्रार आहे.

नगरसेवकांचे दावे

वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उपाययोजना

जलवाहिन्यांची कामे प्रगतिपथावर

सांडपाणी वाहिन्यांच्या कामांना प्राधान्य

प्रशस्त पदपथ, विद्युत व्यवस्था

उद्याने, व्यायामशाळांचे विकसन

नागरिक म्हणतात

रस्त्यांवर सातत्याने निरनिराळी अतिक्रमणे होतात. वाहतुकीची समस्या काही प्रमाणात सुटली असली, तरी त्यामध्ये सुधारणेस वाव आहे. प्रभागात अनेक ठिकाणी अस्ताव्यस्त स्वरूपात कचरा टाकला जातो. सार्वजनिक स्वच्छतागृहांची ही कमतरता आहे. मोकाट श्वांनाचा उपद्रकही मोठा आहे.

– राजेश भोसले, मुंढवा

वस्ती भागात सांडपाणी वाहिन्यांचे प्रश्न आहेत. सांडपाणी वाहिन्यात ठरावीक कालावधीत फु टतात किं वा तुंबतात. मोठे उद्यान प्रभागात नाही. पर्यायी रस्त्यांची आवश्यकता आहे. प्रशस्त पदपथ नसल्यामुळे चालण्यास अडचण निर्माण होते. भाजी मंडई काही ठिकाणी रस्त्यावर असते. नागरिकांसाठी पायाभूत सुविधा अपेक्षित आहेत.

– राणी निकम, माळवाडी

राजकीय प्रतिनिधी म्हणतात

वाहतुकीचा प्रश्न ही या प्रभागातील मोठी समस्या आहे. त्यात अजून सुधारणा होणे अपेक्षित आहे. काही ठिकाणी पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नाही. पायाभूत सुविधा निर्मितीवर नगरसेवकांनी भर देणे अपेक्षित आहे. मुंढव्यात काही भागात पाणीसमस्या आहे. कचरा वर्गीकरणाचाही प्रश्न दिसतो.

– अश्विनी गायकवाड, भाजप

रस्ता रुंदीकरणाचे काही प्रश्न प्रभागात आहेत. वाहनतळ नसल्यामुळे वाहतुकीला शिस्त नाही. व्यापारी वर्गाच्याही मोठय़ा समस्या आहेत. नाटय़गृहाचे कामही रखडले आहे. बेबी कालव्यावरून रस्ता के ल्यास वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होईल. बाहेरील शहरातून येणाऱ्या मोठय़ा खासगी प्रवासी गाडय़ा सोसायटय़ांपुढे लावल्या जातात.

– समीर तुपे, शिवसेना

प्रभागातील समस्यांचा लेखाजोखा

महापालिके च्या गेल्या निवडणुकीत सर्वच पक्षांनी नागरिकांना भरघोस आश्वासने दिली होती. या आश्वासनांचे काय झाले, कोणती कामे झाली, कोणत्या योजना प्रत्यक्षात आल्या याचा आढावा ‘प्रभागाचे प्रगतिपुस्तक’ या वृत्तमालिके तून दररोज घेतला जात आहे.

प्रभागांमधील नागरिकांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे, नागरिकांचे प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी प्रभागाचे नगरसेवक काय करत आहेत, गेल्या साडेतीन वर्षांत कोणत्या समस्या सुटल्या, कोणती कामे रखडली, कोणती कामे झाली याची सविस्तर माहिती या वृत्तमालिके तून देण्यात येत आहे. वृत्तमालिका सुरू झाल्यानंतर नागरिकांकडून त्याला प्रतिसाद मिळत असून विविध प्रभागातील नागरिकांनी त्यांना दैनंदिन भेडसाविणाऱ्या समस्या कळविल्या आहेत. यातील काही निवडक समस्यांची माहिती या सदरातून प्रसिद्ध के ली जात आहे.

नागरिकांनी आपल्या भागातील समस्या, प्रश्न पुढील ई-मेल पत्यावर पाठवावेत. समस्यांचे छायाचित्रही पाठविता येईल. आपले नाव आणि संपर्क क्रमांकही अवश्य द्यावा.

इ-मेल- lokpune4@gmail.com

लोकप्रतिनिधी म्हणतात

वाहतूक कोंडी सोडविण्याच्या दृष्टीने पाठपुरावा सुरू आहे. मगरपट्टा सिटी परिसरातील रस्ता रुंदीकरणाची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. कोरेगाव पार्कमधून येणाऱ्या पुलाचे काम पूर्ण झाले आहे. मगरपट्टासिटी लगत बहुउद्देशीय क्रीडा संकु लाचे काम करण्यात येत आहे. वाहतूक कोंडी सोडविण्याला प्राधान्य आहे. पर्यायी रस्त्यांची कामे करण्याचा प्रयत्न आहे.

– हेमलता मगर, नगरसेविका

सरवदे कॉलनी परिसरातील पाणी प्रश्न सोडविण्यात

आला आहे. याच ठिकाणी सांडपाणी वाहिन्यांची कामेही करण्यात आली आहेत. या भागातील सांडपाणी वाहिन्या तुंबण्याच्या घटना सातत्याने घडत होत्या. हा प्रश्न मार्गी लावला आहे. वाहतूक कोंडी सोडविण्याच्या दृष्टीनेही पाठपुरावा सुरू आहे. मुंढवा चौकात व्यायामाशाळा उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आहे.

– पूजा कोद्रे, नगरसेविका

प्रभागातील पाण्याची समस्या गंभीर नव्हती. मात्र ज्या भागात पाणीप्रश्न होता तिथे जलवाहिनी टाकण्यात आल्या आहेत. भोसलेनगर, मुंढवा गावठाण, लक्ष्मी कॉलनी परिसरात जलवाहिन्यांबरोबरच सांडपाणी वाहिन्यांची कामे करण्यात आली आहेत. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. प्रभागातील समस्या जवळपास सुटल्या आहेत.

– सुनील  ऊर्फ  बंडू  गायकवाड, नगरसेवक

तक्रारींचा पाढा

प्रशस्त पदपथांचा अभाव

विद्युत व्यवस्था अपुरी

कचऱ्याचा प्रश्न

सांडपाणी वाहिन्या तुंबण्याचे प्रकार

बेशिस्त पार्किंग

प्रभागातील महत्त्वाची ठिकाणे

मुंढवा, मुंढवा गावठाण, मगरपट्टा सिटी, माळवाडी, सातव प्लॉट, बनकर कॉलनी, पुणे-सोलापूर महामार्गाचा उजव्या बाजूचा परिसर, आकाशवाणी परिसर, लक्ष्मी कॉलनी, भोसलेनगर, गवळी आळी, त्रिवेणीनगर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 5, 2021 1:28 am

Web Title: mundhava flyover not useful dd 70
Next Stories
1 भारताच्या १२ हजार वर्षांच्या इतिहासाचे समांतर लेखन
2 जागतिक अभियांत्रिकी संस्थांमध्ये ‘आयआयटी’ मुंबई ४९व्या स्थानी
3 देशातील १५ लाख शाळा बंद
Just Now!
X