मर्जीतील आयुक्तांना ४ वर्षांची बक्षिसी

पिंपरी पालिकेत आयुक्तपदी आलेला अधिकारी पूर्णकाळ टिकत नाही, असेच चित्र पुढे आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पाठबळ लाभलेले दिलीप बंड आणि आशिष शर्मा या दोन्हीही आयुक्तांना मुदतीपेक्षा एक वर्ष जास्त अर्थात चार वर्षांचा कालावधी मिळाला. तथापि, त्यानंतर आलेले डॉ. श्रीकर परदेशी, राजीव जाधव आणि दिनेश वाघमारे यांची मुदतपूर्व बदली झाली. परदेशी १८ महिन्यांत, जाधव २४ महिन्यांत तर वाघमारे ११ महिन्यांत बदलून गेले. आता नवे आयुक्त श्रावण हर्डीकर किती कालावधी काढतात, हा औत्सुक्याचा विषय आहे.

‘नागपूर कनेक्शन’ असलेले हर्डीकर मुख्यमंत्र्यांचे विश्वासू अधिकारी आहेत. भाजपची पूर्ण सत्ता आल्यानंतर त्यांना पिंपरीत आणण्यात आले, यात बरेच काही आले. मावळते आयुक्त वाघमारे यांनाही मुख्यमंत्र्यांनी विशिष्ट हेतू ठेवून पिंपरीत आणले होते. वर्षभर पिंपरीत काढा, असे सांगूनच त्यांची पाठवणी करण्यात आली होती. अपेक्षेनुसार वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच वाघमारे यांची बदली झाली. वाघमारे त्यांना हव्या असलेल्या समाजकल्याण विभागात सचिव म्हणून नियुक्त झाले आहेत.

पिंपरी पालिका १५ वर्षांपासून राष्ट्रवादीच्या ताब्यात होती. या कालावधीत आयुक्तपदी पवारांच्या विश्वासातील अधिकाऱ्यांची वर्णी लागली होती. दिलीप बंड २००४ ते २००८ मध्ये आयुक्त होते. अजित पवारांचा पूर्ण पाठिंबा असल्याने बंड म्हणेल, असाच कारभार चार वर्षे झाला. बंडांची बदली झाल्यानंतर शर्मा पालिकेत आले, तेही चार वर्षे राहिले. आधीचा ‘खड्डा’ भरून काढण्यासाठी शर्माना बरीच कसरत करावी लागली होती. त्यांच्या बदलीनंतर, पवारांनी डॉ. श्रीकर परदेशी यांना आयुक्त म्हणून आणले. मात्र, काही दिवसांतच परदेशी यांचे पवारांच्या राष्ट्रवादीशी खटके उडू लागले. विशेषत: परदेशी यांनी सुरू केलेली अनधिकृत बांधकामे पाडण्याची कारवाई राष्ट्रवादीला अडचणीची ठरत होती. त्यातून त्यांची मुदतपूर्व बदली करण्यात आली. यानंतर, पवारांचे ‘खास’ राजीव जाधव िपपरीत आले. त्यांनी अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादीच्या सोयीचा कारभार केला. दरम्यानच्या काळात, राज्यात भाजपचे सरकार आले. पिंपरी पालिकेच्या निवडणुका होऊ घातल्या असताना ‘राष्ट्रवादीधार्जिणा’ आयुक्त नको, असा सूर भाजपच्या स्थानिक नेत्यांनी लावला, त्याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी राजीव जाधव यांची बदली केली. तेथे वाघमारे आले आणि वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच तेही गेले. आता नव्या आयुक्तांची नवी ‘इिनग’ सुरू होत असून, ते तरी तीन वर्षांचा कालावधी पूर्ण करतील का, असा प्रश्न पालिका वर्तुळात उपस्थित केला जात आहे.

आयुक्त आणि सत्तेचे गणित

दिलीप बंड यांच्या कारर्कीर्दीत २००७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला प्रथमच निर्विवाद बहुमत मिळाले. राष्ट्रवादीचे ६० नगरसेवक चिन्हावर निवडून आले होते. पुढे आशिष शर्मा यांच्या काळात २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे ८३ नगरसेवक चिन्हावर निवडून आले आणि पालिकेची सत्ता राष्ट्रवादीकडे कायम राहिली. २०१७ मध्ये तसे झाले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार दिनेश वाघमारे यांना फक्त निवडणुका होईपर्यंत पिंपरी पालिकेत आणण्यात आले. फेब्रुवारी २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा सपशेल पराभव होऊन भाजपचा झेंडा फडकला.