27 January 2021

News Flash

पिंपरी पालिका आयुक्त बदलीमागे आगामी पालिका निवडणुकांचे कारण

यापूर्वीच्या दोन्ही पालिका निवडणुका राष्ट्रवादीने जिंकल्या, तेव्हा त्या-त्या वेळी असलेल्या पालिका आयुक्तांचे मोठे ‘योगदान’ राष्ट्रवादीला लाभले होते.

पिंपरी महापालिकेचे आयुक्त राजीव जाधव यांची अखेर पिंपरी पालिकेतून बदली झाली असून त्यांच्या जागी नवी मुंबई पालिकेचे आयुक्त दिनेश वाघमारे यांची वर्णी लागली आहे. जाधव यांच्याकडे नाशिक येथील आदिवासी विकास विभागाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. पिंपरी महापालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय असलेल्या जाधव यांची मुदतपूर्व बदली करण्यात आल्याचे मानले जात आहे.
पिंपरीतील सत्तारूढ राष्ट्रवादी काँग्रेसला डोकेदुखी ठरलेल्या डॉ. श्रीकर परदेशी यांची अवघ्या १८ महिन्यांत बदली झाल्यानंतर रत्नागिरीचे तत्कालीन जिल्हाधिकारी असलेले राजीव जाधव यांची पिंपरी पालिकेत वर्णी लागली, १० फेब्रुवारी २०१४ रोजी ते रुजू झाले. तथापि, निर्धारित मुदत पूर्ण होण्यापूर्वीच म्हणजेच २४ महिन्यांच्या कारकीर्दीनंतर त्यांची नाशिकला बदली करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकाच वेळी ७३ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश काल उशिरा रात्री दिले, त्यात जाधव यांचाही समावेश होता. आयुक्तांच्या बदलीमागे आगामी पालिका निवडणुका हे महत्त्वाचे कारण मानले जाते. २०१७ मध्ये महापालिकेच्या निवडणुका होत आहेत. पालिकेतील सत्तारूढ राष्ट्रवादीला राज्यातील सत्तारूढ भाजपशी दोन हात करायचे आहेत. यापूर्वीच्या दोन्ही पालिका निवडणुका राष्ट्रवादीने जिंकल्या, तेव्हा त्या-त्या वेळी असलेल्या पालिका आयुक्तांचे मोठे ‘योगदान’ राष्ट्रवादीला लाभले होते. त्यामुळे पिंपरीत स्थिरसावर झालेले आणि राष्ट्रवादीच्या अतिशय सोयीचे असलेले जाधव निवडणूक काळात अडचणीचे ठरतील, या भावनेतून भाजपने त्यांच्या बदलीसाठी बरेच प्रयत्न चालवले होते. मात्र, अजितदादांच्या भक्कम पाठबळामुळे ते शक्य होत नव्हते. अखेर, मुख्यमंत्र्यांनी जाधव यांच्या बदलीवर शिक्कामोर्तब केले. दरम्यान, पूर्वनियोजित बैठकीसाठी आयुक्त गुरुवारी सकाळीच मुंबईला गेले होते.
— 
नवे आयुक्त दिनेश वाघमारे राष्ट्रवादीचीच सत्ता असलेल्या नव्या मुंबईत आयुक्तपदी होते. वय वर्षे ५० असलेले वाघमारे १९९४ च्या तुकडीचे आहेत. गेली २२ वर्षे ते प्रशासकीय सेवेत आहेत. सामाजिक न्याय खात्याचे सचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. सहा जानेवारी २०१५ पासून ते नवी मुंबईत होते. तथापि, १५ महिन्यांतच तेथून वाघमारे यांची बदली करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 29, 2016 3:30 am

Web Title: municipal elections pimpri municipal commissioner transfer
टॅग Transfer
Next Stories
1 खगोलशास्त्रविषयक शिबिराचे आयोजन
2 दुष्काळी भागातील गरजू कुटुंबांना ‘परिवर्तन जीवन किट’चे वाटप
3 मॅपल ग्रुपच्या सचिन अग्रवाल यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला
Just Now!
X