नालेसफाई आता मुख्य खात्याकडून; क्षेत्रीय कार्यालयांचे अधिकार काढले

पुणे : महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने होत असलेल्या नालेसफाईच्या कामाबाबत गैरव्यवहाराचे आरोप झाल्यानंतर तसेच अधिकाऱ्यांच्या संगनमताने नालेसफाईची कामे कागदावरच दाखवून ठेकेदार लाखो रुपये लाटत असल्याचे प्रकार पुढे आल्यानंतर आता नालेसफाईच्या कामांचे क्षेत्रीय कार्यालयांचे अधिकार काढून घेण्यात आले आहेत. यापुढे मुख्य खात्याकडूनच शहरातील नाल्यांची सफाई होणार आहे. महापालिकेच्या स्थायी समितीने तसा धोरणात्मक निर्णय घेतला असून आगामी आर्थिक वर्षांतील अंदाजपत्रकात तशी घोषणा करण्यात आली आहे.

मे महिना सुरू झाला की नालेसफाईचा मुद्दा प्रकर्षांने पुढे येतो. पावसाळ्याच्या तोंडावर नालेसफाईची कामे करण्यासाठी निविदा प्रक्रिया, ठेकेदारांची नियुक्ती, नाल्यांचे सर्वेक्षण, धोकादायक ठिकाणे शोधण्यास सुरुवात होते. वास्तविक पावसाळ्यापूर्वीच नाल्यांची स्वच्छतेची कामे पूर्ण होणे अपेक्षित असताना ही कामे भर पावसाळ्यातच सुरू असल्याचे चित्र अलीकडच्या काही वर्षांत सातत्याने दिसून आले आहे.

नालेसफाईची कामे ४० टक्केही पूर्ण होत नाहीत. कामे कागदावरच राहत असताना ठेकेदारांना कोटय़वधी रुपयांची बिले अदा केली जात असल्याच्या तक्रारी सर्वपक्षीय नगरसेवकांनी सभागृहात केल्या आहेत. गेल्या पावसाळ्यात तर नालेसफाईचा दावा पूर्णपणे फोल ठरला होता. पावसाळ्याला सुरुवात झाल्यानंतर सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात झालेल्या मुसळधार पावसाने तर शहरातील रस्ते नाल्यातील पाण्यानी भरल्याचे चित्र दिसून आले होते. दिखाऊ नालेसफाईच्या माध्यमातून महापालिकेची तिजोरी लुटण्याचे प्रकार होत असल्यामुळे आता या प्रकाराला आळा घालण्याचा निर्णय सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने घेतला आहे. महापालिकेचे आगामी आर्थिक वर्षांचे अंदाजपत्रक सादर करता स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी तशी घोषणा केली आहे. त्यामुळे नालेसफाईची कामे मुख्य खात्याकडून होणार आहेत.

शहरात १५८.३८ किलोमीटर लांबीचे नाले आहेत.

पावसाळी चेंबर्सची संख्या ३८ हजार ८१ असून पावसाळी गटारांची लांबी १७७.९६७ किलोमीटर आहे. तर कल्व्हर्टची संख्या ४२९ आहे. नालेसफाई, ओढे-नाल्यातील राडारोडा उचलणे, नदीपात्रातील घनकचरा आणि प्लास्टिक कचरा उचलण्याबरोबरच पावसाळी गटारांची स्वच्छता करण्याची कामे आता यापुढे मुख्य खात्याकडून केली जाणार आहे. त्यासाठी अंदाजपत्रकात आठ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

अधिकाऱ्यांवर जबाबदारी

नालेसफाईची कामे मुख्य खात्याकडून करण्यात येत असताना आता अधिकाऱ्यांवरील जबाबदारीही निश्चित केली जाणार आहे. नालेसफाईच्या कामांच्या अनुषंगाने नाल्यांचे सर्वेक्षण करणे, नाल्यावरील अनधिकृत बांधकामे हटविणे, पावसाळ्यापूर्वीच कामांच्या निविदा काढणे, नालेसफाईचा अहवाल देणे आणि कामामध्ये पारदर्शकता ठेवणे, अशा सूचना स्थायी समितीकडून अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

क्षेत्रीय कार्यालयांकडून होत असलेल्या नालेसफाईच्या कामांबाबत नगरसेवकांकडून सातत्याने तक्रारी येत होत्या. कामांचा दर्जा योग्य नसल्याचेही दिसून आले होते. त्यामुळेच हा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे.

– हेमंत रासने, स्थायी समिती अध्यक्ष