महापुरुषांबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर टाकल्यानंतर हडपसर येथे निर्माण झालेल्या तणावानंतर एका टोळक्याने बनकर वस्ती येथे आयटी कंपनीत काम करणाऱ्या तरुणाचा खून केल्याची घटना सोमवारी रात्री घडली. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत अकरा जणांना अटक केली असून, त्यापैकी सात जणांची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे. सर्व आरोपी हिंदू राष्ट्र सेनेचे कार्यकर्ते असल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. या घटनेनंतर तणावग्रस्त असलेली हडपसर परिसरात स्थिती आता परिस्थिती पूर्वपदावर आली आहे.
मोहसीन सादीक शेख (वय २८, रा. बनकर कॉलनी, हडपसर, मूळ-सोलापूर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याचा खून केल्याच्या आरोपावरून विशाल सुत्रावे (वय २१), शुभम बर्डे (वय १९), आकाश लष्करे (वय १९), बाबा मोडक (वय १९), रणजित यादव (वय २४) आणि अतुल अगम (२१, रा. सर्व हडपसर) यांना मंगळवारी रात्री अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना ९ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. इतर सहा जणांस बुधवारी रात्री अटक केली आहे.
या प्रकरणी मोबीन महंमद सादीक शेख (वय २६) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फेसबुकवर महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध केल्याप्रकरणी शहरात काही भागात तणाव निर्माण झाला होता. याबाबत सोमवारी हडपसर पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक झाली. मात्र, परिसरात अनेक अफवा पसराल्यामुळे जमाव रस्त्यावर उतरला होता. यातील दुचाकीवर फिरणाऱ्या टोळक्यांनी रस्त्यावरून जाणाऱ्या विशिष्ट समाजाच्या लोकांवर हल्ला करण्यास सुरुवात केली. त्यामुळे दोघे जण जखमी झाले.
याच वेळी घटनेतील शेख दुचाकीवरून त्यांच्या मित्रासोबत बनकर वस्ती येथील घरी निघाले होते. त्या वेळी सात ते आठ दुचाकींवरून आलेल्या टोळक्याने शेख याच्यावर हॉकी स्टीक, बॅट आणि लाकडी दांडक्याने हल्ला केला. यामध्ये शेख गंभीर जखमी झाला. त्यात त्याचा मृत्यू झाला. तर, रस्त्यातील अमीन शेख (वय ३०, रा. हडपसर) आणि इजाज याकूब बागबान (वय २५) हे दोघे जण जखमी आहेत. पोलिसांना हल्ल्याच्या ठिकाणी मिळालेल्या दुचाकीवरून सात आरोपींना मंगळवारी रात्री अटक केली. त्यांना बुधवारी दुपारी न्यायालयात हजर केले असता ९ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला. दरम्यान, आता या भागात तणाव कमी झाला असला, तरी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
आम्ही निरपराध माणसावर हल्ला केला नाही
याबाबत हिंदूू राष्ट्र सेनेचे धनंजय देसाई यांनी मंगळवारी ‘इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना सांगितले, की सध्या फेसबुकवर जे संदेश फिरत आहेत. ते एक सायबर गुन्हा आहे. निरपराध लोकांना मारहाण करून तो मिटणार नाही. मात्र, हे फोटो फेसबुकवर टाकणाऱ्यांचा आम्ही निषेध करतो. आम्ही कोणत्याही निरपराध व्यक्तीवर हल्ला केलेला नाही. असे हल्ले करण्यासही आमचा विरोध आहे.
खुनात सहभागी आरोपींवर एमपीडीएची कारवाई
हडपसर येथील खुनाच्या घटनेत सहभागी असलेल्या आरोपींच्या विरुद्ध महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ डेन्जरस अॅक्टिव्हिटी (एमपीडीए) कायद्याअंतर्गत कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलीस आयुक्त सतीश माथुर यांनी दिली. शहरात गेल्या दोन दिवसांत झालेल्या घटना शहर आणि पुणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत असल्यामुळे दोघांकडून त्यांच्यावर संयुक्त कारवाई केली जाणार आहे. पकडलेल्या आरोपींची देवाण-घेवाण केली जाईल, असे माथुर यांनी सांगितले.