पुणे-सातारा रस्त्यावरील घटना

पुणे : वैमनस्यातून पुणे-सातारा रस्त्यावरील लक्ष्मी नारायण चित्रपटगृहाजवळ हातात कोयते घेतलेल्या टोळक्याने दोन तरुणांचा पाठलाग करुन खुनाचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. जीव वाचविण्यासाठी दोघे जण रस्त्यावरील एका दुकानात लपल्याने बचावले. दरम्यान, हा संपूर्ण घटनाक्रम परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी चित्रित केला गेला आहे.

या प्रकरणी विकास कांबळे उर्फ थापा  (रा. लोहियानगर, महात्मा फुले पेठ) याच्यासह नऊ जणां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पसार झालेल्या विकास कांबळे आणि त्याचा साथीदार विनय कांबळे यांना बुधवारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक निकम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रघुनाथ गायकवाड तसेच सचिन गायकवाड, विल्सन डिसुझा यांनी सायंकाळी ताब्यात घेतले.  कांबळेला रात्री उशिरा अटक करण्यात आली. विशाल  भोसले (वय २४,रा. पर्वती) याने याबाबत दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. टोळक्याने केलेल्या हल्लयात भोसले याच्यासह महेंद्र राजेंद्र नवले (वय २१,रा. पर्वती दर्शन) आणि अक्षय दत्तात्रय कुरधोनकर (वय २०,रा.महर्षीनगर, गुलटेकडी) जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल भोसलेचा मित्र  अमर गायकवाड याची डिसेंबर महिन्यात विकास कांबळे याच्याशी भांडणे झाली होती.  मंगळवारी रात्री आरोपी विकास आणि त्याच्याबरोबर असलेले साथीदार पर्वती पायथ्याजवळ असलेल्या जनता वसाहतीत शिरले. त्यांनी अमरवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अमर तेथून पसार झाला. अमरचा मित्र विशालवर टोळक्यातील एकाने कोयत्याने वार केला. त्यानंतर रात्री साडेनऊच्या सुमारास विशालचे मित्र महेंद्र नवले, अक्षय कुरधोनकर यांना लक्ष्मी नारायण चित्रपटगृहाजवळ आरोपी विकास आणि त्याच्या साथीदारांनी गाठले.

टोळक्याने महेंद्र आणि अक्षयचा पाठलाग सुरु केला. पुणे-सातारा रस्त्यावर टोळके कोयते हातात घेऊन पळत होते. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराट उडाली. टोळक्याने महेंद्र आणि अक्षयवर वार केले. जखमी अवस्थेत दोघे जण तेथून  पळाले आणि पर्वती दर्शन भागातील एका दुकानात लपले. दुकानाबाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी टोळक्याला टिपले. त्यानंतर टोळके तेथून पसार झाले. पोलीस  उपनिरीक्षक विठ्ठल झांजुर्णे तपास करत आहेत.

महिन्याभरात शहरात बारा खून

जानेवारी महिन्यात शहराच्या वेगवेगळ्या भागात पूर्ववैमनस्य, कौटुंबिक वाद तसेच किरकोळ वादातून १२ जणांचे खून करण्यात आले. सिंहगड रस्ता तसेच कोथरूड भागातील खून प्रकरणात अल्पवयीन मुलांचा सहभाग होता. जनता वसाहतीत  सराईत नीलेश वाडकरवर गुंड सुनील बोकेफोडे उर्फ चॉकलेट सुन्या आणि साथीदारांनी वार करुन खून केला होता. दहशत निर्माण करण्यासाठी गुंडांनी कोयत्याचा वापर केल्याचे उघडकीस आले आहे.

कोयते विक्रे त्यांवर कारवाई; २२५ कोयते जप्त

दरम्यान, शहरात वाढलेली गुन्हेगारी तसेच मंगळवार पेठेतील जुना बाजार परिसरात कोयते,सुरे, चाकूची विक्री करणाऱ्यांवर बुधवारी सायंकाळी कारवाई केली. या प्रकरणी पाच विक्रे त्यांवर फरासखाना पोलिसांनी कारवाई केली. त्यांच्याकडून २२५ कोयते जप्त करण्यात आले आहेत. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे काम सुरु होते.