पिंपरी-चिंचवडमधील चिखली परिसरात घरातून मित्राचे अपहरण करून दहा जणांच्या टोळक्याने त्यांचा निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने दोन जणांना ताब्यात घेतलं असून, यातील मुख्य आरोपी हा फरार आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहेत. आर्थिक व्यवहारात फेरफार केल्याचा कारणावरून हा खून झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.

सचिन चौधरी (वय- २२ रा. रुपीनगर तळवडे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान, मृत्यू झालेला तरुण आणि आरोपी हे मित्र असून सराईत गुन्हेगार आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. शुक्रवारी सचिनचं अपहरण करण्यात आलं होतं. त्यानंतर आज(रविवार) शिरगाव पोलीस चौकीच्या हद्दीत त्याचा मृतदेह आढळला. याप्रकरणी सनी उर्फ नकुल कुचेकर (वय-२५ रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) आणि गौरव रमेश डांगले (वय-२२ रा. चिंचवडगाव) या दोघांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी योगेश दिनेश सावंत आणि मृत सचिन चौधरी हे दोघेही मित्र होते. त्यांची लहानपणापासून मैत्री होती. दरम्यान, योगेशचे आर्थिक व्यवहार सचिन पाहायचा. मात्र, यात सचिनने फेरफार केल्याचा संशय योगेशला होता. त्यामुळेच शुक्रवारी इतर मित्राच्या साथीने राहत्या घरातून योगेशने सचिनचे अपहरण केले व त्याच रात्री मित्रांच्या मदतीने त्याचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून केला. त्यानंतर घटनास्थळावरून सर्व जण पसार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. चिखली पोलीस सचिनचा शोध घेत असताना, आज सायंकाळी शिरगाव पोलीस चौकीच्या हद्दीत त्याचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने दोघांना ताब्यात घेतलं असून मुख्य आरोपीसह आठजण फरार आहेत, अशी माहिती चिखली पोलिसांनी दिली आहे.

दरम्यान, अपहरण प्रकरणी योगेश दिनेश सावंत, आकाश उर्फ गुंड्या प्रकाश भालेराव, रुपेश प्रकाश आखाडे यांच्यासह इतर सात ते आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती चिखली पोलिसांनी दिली आहे. या सर्वांवर गंभीर गुन्हे दाखल असून, हे सर्वजण सराईत गुन्हेगार आहेत. तसेच, मृत सचिन चौधरी याच्यावर देखील निगडी पोलीस ठाण्यात खूनाचा प्रयत्न, मारामारी असे गुन्हे दाखल आहेत.