कर्वे रस्त्यावरील सुरेश अलुरकर हे नाव घेतल्यानंतर २००८ पूर्वी तीन गोष्टी समोर येत होत्या. त्या म्हणजे त्यांना असणारे संगीताचे ज्ञान, त्यांच्याकडे असणारा संगीताचा दुर्मीळ साठा आणि अलुरकर म्युझिक हाऊस. मात्र, डिसेंबर २००८ नंतर त्यांचे नाव घेतल्यानंतर प्रत्येकाच्या मनात फक्त एक गोष्ट येते.. ती म्हणजे अलुरकर यांच्या खुनाचे न उकललेले गूढ! आता तर पाच वर्षांपूर्वी या खुनाच्या गुन्ह्य़ात पोलिसांनी खुनाचा तपास तात्पुरता बंद केल्याचा अहवाल न्यायालयात सादर केला आहे. त्यामुळे पुण्यातील एका महत्त्वाच्या खुनाचे गूढ कायमच राहिले आहे.
कर्वे रस्त्यावरील स्वप्ननगरी सोसायटीत सुरेश अलुरकर राहात होते. या ठिकाणीच संगीताच्या जुन्या व दुर्मीळ सीडीचे अलुरकर म्युझिक हाऊस हे दुकान होते. १४ डिसेंबर २००८ रोजी अलुरकर यांच्या शेजारी राहणारे अशोक पाध्ये यांना दुपारी अलुरकर हे त्यांच्या सदनिकेत रक्ताने माखलेल्या स्थितीत आढळून आले होते. या प्रकरणी त्यांनी तत्काळ डेक्कन पोलिसांना कळविले. अलुरकर यांच्यावर धारदार चाकूने हल्ला करण्यात आला होता. सदनिकेत अनेक ठिकाणी रक्त पडल्याचे आढळून आले. तसेच, पोलिसांना  अलुरकर यांच्या मृतदेहाशेजारी चाकू मिळाला होता. या प्रकरणी तपास केल्यानंतर आठ तासांपूर्वीच अलुरकर यांचा खून झाल्याचे निष्पन्न झाले. या गुन्ह्य़ाचा तपास डेक्कन व शहर गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी केला. यामध्ये विविध बाजूने तपास करण्यात आला. याबाबत पोलिसांनी सांगितले की, अलुरकर मुळशीमध्ये जमीन खरेदी करीत होते. यामध्ये जमिनीच्या व्यवहाराचा काही संबंध आहे का याचा तपास केला. तसेच, कौटुंबिक वाद, सीडीचे कॉपीराईट व जुन्या सीडीच्या रेकॉर्डचा वाद अशा विविध मुद्यांवर तपास केला. तीनशे दहा गुन्हेगारांकडे चौकशी करण्यात आली आहे, तर एक हजार नागरिकांचे याबाबत जबाब घेण्यात आले आहेत. तसेच हजारो फोनकॉल्स तपासण्यात आले. अलुरकर यांच्यावर वार झाल्याचे पाहिल्यानंतर तपासात हल्ला करणारी व्यक्ती डावखुरी असल्याचे आढळून आले. त्यादृष्टीनेही तपास केला. मात्र, अखेपर्यंत या खुनात काहीच धागेदोरे मिळालेले नाहीत. या प्रकरणी जानेवारी २०१० मध्ये डेक्कन पोलिसांनी न्यायालयात अ समरी अहवाल (गुन्ह्य़ाचा तात्पुरता तपास बंद) न्यायालयात सादर केला. तो न्यायालयाने मान्य केला आहे.
याबाबत अलुरकर यांचा मुलगा विनीत यांनी सांगितले की, खुनानंतरचे काही दिवस खूपच अवघड होते. मात्र, नातेवाईकांच्या आधारामुळे सावरलो. या गुन्ह्य़ात पोलिसांना संपूर्ण सहकार्य केले. मात्र, २००९ नंतर या खुनाच्या तपासाबाबत पोलिसांकडून काही संर्पक साधला नाही. तसेच, या गुन्ह्य़ाचा तपास तात्पुरता बंद केल्याबाबत काहीच कळविलेले नाही. तसेच, पोलिसांकडून कोणताही त्रास झाला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.