भोसरीत एका महाविद्यालयीन तरुणावर धारदार शस्त्राने वार करून डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली आहे. या प्रकरणी भोसरी पोलिसांनी तिघांना अटक केली असून तरुणीच्या छेडछाडीतून ही घटना घडल्याचे समोर आले आहे. पिंपरी-चिंचवड परिसरात बारा तासात दोन खुनाच्या घटना घडल्या आहेत.
भैरव नंदकुमार देसाई (वय २१, रा. लांडगे वस्ती, भोसरी, मूळ- बेळगाव) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो भोसरी येथील एका महाविद्यालयात अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षांला शिकत होता. देसाईचा खून केल्याच्या आरोपावरून अक्षय सुरेश हडवळे (वय २१), सुमित अशोक पोखरकर (वय १९) आणि दत्तात्रय लक्ष्मण गुंजाळ (वय १९, रा. धावडे वस्ती, भोसरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरीतील लांडगे वस्तीजवळील मोकळ्या मैदानात सकाळी एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. नागरिकांनी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली असता एका तरुणावर धारदार शस्त्राने वार करून खून केल्याचे उघडकीस आले. त्या तरुणाकडे सापडलेल्या ओळखपत्रावरून त्याची ओळख पटली.
या गुन्ह्य़ाचा तपास भोसरी पोलिसांनी सुरू केला असता त्यांना देसाई याची तरुणीच्या छेडछाडीच्या कारणावरून आरोपी हडवळेचा भाऊ आणि वडिलांसोबत भांडणे झाली होती. गुरुवारी रात्री तिघे जण त्याला घेऊन गेल्याची माहिती मिळाली. मोकळ्या मैदानात नेऊन त्याच्यावर धारदार शस्त्रांनी वार केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शोध सुरू केला. पोलीस उपनिरीक्षक संजय कांदलकर, अमोल बनसोडे आणि दीपक रावते यांनी आरोपींना आळेफाटा येथून अटक केली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 26, 2014 2:45 am