फेसबुकच्या माध्यमातून महापुरुषांबाबत आक्षेपार्ह मजकूर टाकल्याच्या प्रकारानंतर हडपसर भागात निर्माण झालेल्या तणावानंतर एका तरुणाचा खून होण्याची घटना सोमवारी घडली. या प्रकरणातील सर्व आरोपी हे हिंदू राष्ट्र सेनेचे कार्यकर्ते असल्याने या संघटनेवर बंदीबाबत विचारले असता, ‘बंदी घालणे ही एका दिवसाची प्रक्रिया नाही. मात्र, या घटनेबाबत केंद्राकडे अहवाल पाठविणार असून, त्या दृष्टीने पाठपुरावा करणार आहोत’, अशी माहिती पोलीस आयुक्त सतीश माथुर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
सहआयुक्त संजय कुमार, अतिरिक्त आयुक्त आब्दूर रहमान व पोलीस उपायुक्त मनोज पाटील हे या वेळी उपस्थित होते. माथुर म्हणाले, की पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याने त्या भागामध्ये आता तणाव निवळला आहे. संपूर्ण घटनेबाबत आम्ही केंद्र शासनाकडे अहवाल सादर करणार आहोत.
आक्षेपार्ह मजकूर फेसबुकच्या माध्यमातून सर्वत्र गेला असला, तरी त्याचे पडसाद पुण्यातच का उमटले, याबाबत तपास करण्यात येत असल्याचेही माथुर यांनी सांगितले. हडपसरमधील या प्रकरणामध्ये पोलिसांनी एकूण १७ जणांना अटक केली आहे. त्याचप्रमाणे इतर दोघांनाही ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून चौकशी करण्यात येत आहे. फेसबुकच्या माध्यमातून अनेक गोष्टी टाकल्या जात असतात. आक्षेपार्ह गोष्टी आम्ही काढून टाकण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी संबंधित यंत्रणेशी संपर्क साधण्यात आला आहे.
हडपसर भागामध्ये तणावाची स्थिती निर्माण झाल्यानंतर तरुणाचा खून करण्यात आला. या परिसरात पोलीस बंदोबस्त होता का, या प्रश्नावर माथुर म्हणाले, की तणाव निर्माण झाल्यानंतर या भागात बंदोबस्त ठेवण्यात आला होता.