हडपसरमध्ये भाडेकरूकडून घरमालकाचा खून

भाडे थकले म्हणून शिवीगाळ केल्याने भाडेकरूने घरमालकाचा खून केल्याची घटना हडपसर परिसरात घडली. तर मुंढवा परिसरात एका मजुरावर तीक्ष्ण शस्त्राने वार करून खून करण्यात आला.

प्रवीण ज्ञानदेव होले (वय ४२, रा. होले चाळ, गोंधळेनगर, हडपसर) असे खून झालेल्या घरमालकाचे नाव आहे. याप्रकरणी भाडेकरू धीरज कुमार लोंढे (वय १९, सध्या रा. होले चाळ, गोंधळेनगर, हडपसर, मूळ रा. दांडेकर पूल, पर्वती) याच्याविरु द्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुमित होले याने यासंदर्भात हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

प्रवीण होले यांच्या चाळीत धीरज लोंढे आणि त्याची आई भाडेकरू म्हणून राहत होते. घरभाडे थकल्याने प्रवीण याने धीरज याच्या आईला शिवीगाळ केली होती. त्यामुळे धीरज चिडला होता. शनिवारी मध्यरात्री प्रवीण चाळीतील खोलीत झोपला होता. त्याने दरवाजा उघडा ठेवला होता. धीरज याने त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. यामध्ये प्रवीण याचा जागीच मृत्यू झाला. सकाळी ही घटना उघडकीस आली. पसार झालेल्या धीरज याचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. व्ही. तासगांवकर तपास करत आहेत.

दरम्यान, मुंढव्यातील केशवनगर परिसरात एका मजुरावर तीक्ष्ण शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. विनोद बेग (वय ३५, रा. गवळी गोठा, केशवनगर) असे खून झालेल्या मजुराचे नाव आहे. त्याचा खून केल्याप्रक रणी हरी, शिवपूजन आणि टकला या आरोपींविरुद्ध मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विनोद मूळचा बुलढाणा जिल्ह्य़ातील आहे. तो केशवनगर येथील एका खासगी कंपनीत काम करत होता. पांडुळे यांच्या चाळीत तो राहायला होता. शुक्रवारी त्याच्यासोबत राहत असलेल्या आरोपींनी त्याच्या डोक्यात वीट टाकली तसेच त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. त्यानंतर

आरोपी तेथून पसार झाले. पांडुळे यांनी याघटनेची माहिती पोलिसांना दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जानमहंमद पठाण तपास करत आहेत.