पिंपरी-चिंचवडमध्ये मित्रांनीच पूर्ववैमनस्यातून आपल्या १९ वर्षीय मित्राचा खून केल्याची घटना पिंपरीमध्ये घडल्याचे उघड झाली आहे. धक्कादायकबाब म्हणजे पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी मित्राचा मृतदेह दोन दिवस डिझेल टाकून जाळला. यानंतर तिसऱ्या दिवशी तेथील राख आणि हाडं दुचाकीवर घेऊन ते दापोडी येथील मुळा नदीत नेऊन टाकली. अकेर तीन महिन्यानंतर आरोपींना गजाआड करण्यात पिंपरी पोलिसांनी अखेर यश आले आहे.

जसबीरसिंग उर्फ बिल्लू उर्फ विक्की गुजारसिंग विरदी वय-१९ रा. पिंपरी अस मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर या प्रकरणी नीरज अशोक जांगयानी वय- २६, ललित लालचंद ठाकूर वय- २१, योगेश केशव पंजवाणी वय- ३१, हरज्योतसिंग रणजितसिंग लोहाटी वय- २२ असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत जसबीरसिंग आणि त्याच्या भावाने काही महिन्यांपूर्वी यातील आरोपी नीरज जांगयानी याला बेदम मारहाण केली होती. याचा राग मनात धरून मार्च महिन्यात मृत जसरबीसिंग याला इतर मित्रांच्या मदतीने नीरजने काळेवाडी परिसरात नेले. या ठिकाणी गोठा असलेल्या परिसरात आरोपीने मृत जसबीरसिंगचा इतर मित्रांच्या मदतीने गळा आवळला, तसेच एकाने  त्याच्या डोक्यात दगड घातला. यात घटनस्थळीच मृत्यू झाला. ही सर्व घटना रात्रीच्या सुमारास घडली होती.

गोठ्यातील चारा, पाला पाचोळा आणि वाळलेली लाकडं टाकून पुरावा नष्ट करण्याचा हेतूने मृतदेह पेटवून दिला. मृतदेह जळण्यासाठी वेळ लागत होता, हा सर्व घटनाक्रम पहाटेपर्यंत सुरू होता. मात्र, मृतदेह जळतो की नाही यामुळे त्यांनी घरी जाऊन डिझेल आणले आणि पुन्हा मृतदेह जाळाला. तर, तिसऱ्या दिवशी यातील एका आरोपीने मृतदेहाची राख आणि न जळालेली हाडे हे दुचाकीवरून नेऊन दापोडी येथील मुळा नदीत नेऊन टाकली. मात्र, त्यानंतर घरच्यानी जसबीरसिंग घरी न आल्याने अखेर पिंपरी पोलिसात तो हरवला असल्याची तक्रार नोंदवली.

यानंतर त्याचा तपास सुरू असताना पोलिसांना खबऱ्या मार्फत माहिती मिळाली की, जसबीरसिंग याचा खून करण्यात आला आहे. त्यानुसार संबंधित आरोपींना अटक करून त्यांच्याकडे चौकशी केली असता,त्यांनी  गुन्ह्याची कबुली दिली आहे. घटनेचा अधिक तपास गुन्हे पोलिस निरीक्षक राजेंद्र निकाळजे हे करत आहेत.