किरकोळ कारणावरून मेहुण्यावर चाकूने वार करून खून केल्यानंतर एकाने स्वत: पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना चिंचवडच्या आनंदनगर येथे रविवारी सकाळी घडली.
धनाजी गोविंद चांदणे (वय ३३, रा. आनंदनगर, चिंचवड) असे खून झालेल्याचे नाव आहे. त्याचा मेहुणा प्रकाश हरिश्चंद्र डोलारे  (वय ३२) याने आत्महत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धनाजीची बहीण प्रकाशची पत्नी असून, प्रकाशची बहीण धनाजीची पत्नी आहे. दोघेही आनंदनगर येथे एकाच ठिकाणी राहण्यास आहे. त्याचप्रमाणे दोघेही लोणावळा येथील एका बांधकाम साईटवर चालक म्हणून काम करीत होते. धनाजीला प्रकाशपेक्षा एक हजार रुपये जास्त पगार होता. त्यामुळे त्यांच्यात वारंवार भांडणे होत होती.
शनिवारी रात्री दारूच्या नशेत या दोघांची याच कारणावरून भांडणे झाली. रागाच्या भरात प्रकाशने धनाजीवर धारदार चाकून वार केले. धनाजीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. धनाजीला रुग्णालयात दाखल केल्यानंतर प्रकाश याने घरातील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. रविवारी सकाळी त्याच्या कुटुंबीयांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. पण, दरवाजा न उघडल्यामुळे नागरिकांनी फोन करून पोलिसांना बोलविले. पोलिसांनी घराचा पत्रा उचकटून आत प्रवेश केल्यानंतर प्रकाशने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले. धनाजीच्या मागे पत्नी व दोन मुली, तर प्रकाशच्या मागे पत्नी आणि दोन मुले आहेत. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.