खेळण्यासाठी बाहेर गेलेली अडीच वर्षांची मुलगी बराच वेळ झाला तरी घरी न आल्यामुळे पालकांनी तिचा शोध घेतला. पण, ती न सापडल्यामुळे पोलीस ठाण्यात ती हरवल्याची तक्रार देण्यासाठी गेल्यानंतर तिचा खून झाल्याची माहिती त्यांना समजली. वारजे येथील पेरूच्या मळ्यात या बालिकेचा दगडाने खून केला असल्याचे बुधवारी सकाळी उघडकीस आले.
विशाखा प्रविण सोनवणे (वय- अडीच वर्षे, रा. रामनगर, वारजे) असे खून झालेल्या बालिकेचे नाव आहे. याप्रकरणी तिचे वडील प्रविण सोनवणे यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. विशाखाचा खून का झाला हे स्पष्ट होऊ शकले नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाखाचे वडील हे वारजे भागातील एका जीममध्ये कामाला आहेत. तर आई ही गृहिणी आहे. विशाखाचे वडील हे पहाटे बाहेर कामासाठी पडले. त्यानंतर साडेसातच्या सुमारास विशाखा खेळण्यासाठी बाहेर पडली. मात्र, नऊ वाजले तरी ती घरी परतली नाही. त्यामुळे नातेवाईकांच्या मदतीने आईने विशाखाचा शोध घेतला. पण, ती न सापडल्यामुळे विशाखाचे पालक हे वारजे पोलीस ठाण्यात ती हरवल्याची तक्रार देण्यासाठी गेले.
विशाखा हरवल्याची तक्रार नोंदवून घेण्याचे काम सुरू असतानाच पोलीस ठाण्यात एक फोन आला. वारजे येथील पेरूच्या बागेत एका बालिकेचा मृतदेह आढळून आल्याची माहिती एका व्यक्तीने दिली. त्यानुसार पोलिसांचे एक पथक व विशाखाचे पालक त्या ठिकाणी पोहोचले. त्यांनी मृतदेह पाहिल्यानंतर तो विशाखाचाच असल्याचे ओळखले. तिच्या मृतदेहाशेजारी रक्ताने माखलेला दगड पोलिसांना आढळून आला. याप्रकरणी वारजे पोलिसांनी अपहरण आणि खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. विशाखाचा खून का झाला, याचा शोध घेत आहेत.