पुण्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ब्लॅकमेल करुन सतत पैशांची मागणी करणाऱ्या प्रेयसीचा खून केल्याची घटना घडली आहे. खूनानंतर प्रेयसीचा मृतदेह जंगलात फेकून देण्यात आला होता. या प्रकरणी संशयित आरोपी विपुल भंवरलाल शहा याला अटक करण्यात आली आहे. प्रेरणा कांबळे असे मृत तरूणीचे नाव आहे.

प्रेरणा आणि विपुल शहा यांच्यात अनेकवर्षांपासून प्रेमसंबंध आहेत.  विपुल हा विवाहित आहे. प्रेरणा नेहमी विपुलला आपल्या प्रेमसंबंधांची माहिती त्याच्या कुटुंबीयांना सांगते म्हणून ब्लॅकमेल करायची आणि त्याच्याकडून पैसे घ्यायची असे, विपुलने पोलीस चौकशीत सांगितले आहे. दरम्यान, दि. १५ रोजी कामाला जाते असे सांगून प्रेरणा घरातून निघून गेली. पण दोन दिवसानंतरही ती न परतल्याने अखेर कुटुंबीयांनी वारजे पोलिसांत धाव घेतली होती.

 

विपुल फिरायला जाण्याचा बहाणा करत प्रेरणाला मुळशी परिसरात घेऊन गेला. त्याच्याबरोबर त्याचा मित्रही होता. त्याने कारमध्येच प्रेरणाचा गळा दाबून खून केला आणि तिचा मृतदेह वाघजाई डोंगर परिसरात फेकून दिला होता. प्रेरणाच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून विपुलने हा खून केल्याचे सांगण्यात येते. पोलिसांनी विपुल आणि त्याच्या मित्राला अटक केली आहे.