अनैतिक संबंधांना अडसर ठरणाऱ्या दीड वर्षांच्या मुलाचा गळा दाबून खून केल्याची घटना शनिवारी रात्री रांजणगाव ‘एमआयडीसी’ परिसरात घडली. याप्रकरणी शिरुर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गंगाधर मलकल्लप्पा हत्तरखिल्लाळ (मूळ रा. विजापूर, कर्नाटक) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी मुलाचे वडील मलकल्लप्पा कुमारप्पा हत्तरखिल्लाळ (वय ३०, रा. बागेवाडी, विजापूर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून धिरप्पा उर्फ चक्रप्पा शंकरप्पा खानपूर (रा. बागेवाडी, विजापूर) याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मलकप्पाची पत्नी सुजाता व आरोपी यांचे अनैतिक संबंध होते. ते रांजणगाव एमआयडीसीमध्ये मजुरीची कामे करतात. सुजाता ही मूळगावी जाऊ नये म्हणून आरोपीने तिच्या दीड वर्षांच्या मुलाचा ३१ मार्च २०१३ रोजी गळा दाबून खून केला. हा प्रकार विजापूर येथे गेल्यावर उघडकीस आल्यानंतर कर्नाटकमधील विजापूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तो शिरुर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला असून याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक भजनावळे हे अधिक तपास करीत आहेत.