राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे भोर तालुकाध्यक्ष आणि भूगाव ग्रामपंचायतीचे सदस्य विजय संपतराव मिरघे (वय ३५) यांच्यावर डोक्यात तीक्ष्ण शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना बुधवारी (२३ डिसेंबर) मध्यरात्री घडली. भूगाव-माताळवाडी रस्त्यावरील परांजपे टाऊनशीपच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर झालेल्या विजय मिरघे यांच्या खुनामागचे कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र, वैमनस्यातून किंवा व्यावसायिक वादातून त्यांचा खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
मिरघे हे भूगावजवळील माताळवाडी परिसरात वास्तव्यास आहेत. मिरघे कुटुंबीयांचा भूगाव परिसरात दबदबा आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या भोर तालुक्यासह वेल्हा आणि मुळशीची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली होती. भूगाव ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादीचे संपूर्ण पॅनेल निवडून आणण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. मिरघे यांच्या खुनानंतर भूगाव, माताळवाडी परिसरामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. हल्लेखोरांच्या तपासासाठी पोलिसांची दहा पथके रवाना करण्यात आली असून ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. जय जाधव यांनी घटनास्थळाला भेट दिली आहे. मिरघे यांच्यामागे आई-वडील, पत्नी, मुलगा, मुलगी, दोन भाऊ आणि बहिणी असा परिवार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  बुधवारी रात्रीचे जेवण झाल्यानंतर ‘माझे गावात काम आहे. ते उरकून परत येतो’, असे सांगून मिरघे आपल्या मोटारीतून घराबाहेर पडले. काम संपवून घराकडे परतत असताना परांजपे टाऊनशीपच्या प्रवेशद्वारासमोर मध्यरात्री बाराच्या सुमारास एका हल्लेखोराने त्यांची गाडी अडविली. धारदार शस्त्र घेऊन हल्लेखोर मिरघे यांच्या अंगावर धावून गेले असता जीव वाचविण्यासाठी ते पळाले. मात्र, हल्लेखोराने मिरघे यांना गाठत त्यांच्यावर प्राणघातक हल्ला चढविला. त्यांच्या डोक्यावर सपासप वार केले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या मिरघे यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच ते मरण पावले होते.
या घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. जय जाधव, अतिरिक्त पोलीस अधीक्षक राजकुमार शिंदे, देहूरोडचे उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक पानसरे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक राम जाधव, पौड पोलीस ठाण्याचे निरीक्षक विश्वंभर गोल्डे यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणी पौड पोलीस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, मिरघे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात आणण्यात आला होता. तेथे कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. गेल्या काही दिवसांपासून मिरघे यांचे राजकीय वर्चस्व वाढत होते. मिरघे यांचा खून वैमनस्यातून झाला असावा, असा संशय व्यक्त करीत पोलिसांनी त्यादृष्टीने तपास सुरू केला आहे.
भूगाव परिसरातील माताळवाडी येथे विजय मिरघे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता टेमघरे, जिल्हा दूघ संघाचे संचालक रामचंद्र ठोंबरे, राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष राजेंद्र कोरेकर, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शुक्राचार्य वांजळे, सभापती रवींद्र कंधारे, गटनेते शांताराम इंगवले या वेळी उपस्थित होते.

Shobha Bachhav, BJP Dhule,
धुळ्यात भाजप, काँग्रेसमध्ये चुरशीची लढत ? शोभा बच्छाव यांच्या उमेदवारीनंतर जिल्हाध्यक्षांचा राजीनामा
archana patil dharashiv ncp candidate
राष्ट्रवादीच्या उमेदवार म्हणतात, “मी कशाला पक्षाचं वर्चस्व वाढवू?” तीन दिवसांपूर्वीच पक्षप्रवेश केलेल्या अर्चना पाटील यांचं विधान चर्चेत!
Sharad Pawar Wardha tour
वर्धा : शरद पवार यांच्याकडे काँग्रेस नेत्यांच्या तक्रारी, पवार म्हणाले…
gathering of wrestlers pune
मी काही स्वार्थासाठी बारामती, बारामती करायला आलो नाही : अजित पवार