सात महिन्यांच्या मुलीच्या आजाराला कंटाळलेल्या आईनेच तिला लिंबू सरबतमधून विषारी औषध देऊन खून केला. त्यानंतर स्वत: देखील हे विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेत मुलीचा मृत्यू झाला असून आईची प्रकृती ठीक झाली आहे. मुळशी तालुक्यातील अंबरवेट गावात ही घटना घडली असून उपचारानंतर ठीक झालेल्या आईला पौड पोलिसांनी अटक केली आहे.
प्रांजल गणेश गावडे (वय सात महिने) असे खून झालेल्या बालिकेचे नाव आहे. याप्रकरणी तिची आई रेखा गणेश गावडे (वय २३, रा. रावडेवाडी, अंबरवेट, ता. मुळशी) हिला अटक केली आहे. याप्रकरणी गणेश लक्ष्मण गावडे (वय ३२) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश एका मोटारीवर चालक म्हणून काम करतात. तर रेखा या गृहणी आहेत. त्यांना सात महिन्यांपूर्वी प्रांजल नावाची मुलगी झाली होती. तिला जन्मापासूनच श्वसनाचा त्रास होता. त्यामुळे अनेक वेळा प्रांजलला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. पण, तिची प्रकृती सुधारत नव्हती. तिच्या या आजाराला कंटाळून रेखा यांनी २२ जानेवारीला रात्री आठ वाजता घरी कोणी नसताना प्रांजलला किचनमध्ये नेले. या ठिकाणी लिंबुसरबतमध्ये झुरळे मारण्याची पावडर टाकून ते प्रांजलला चमच्याने पाजले. त्यानंतर स्वत: देखील त्यांनी हे लिंबू सरबत पिले. लिंबूसरबत पिल्यानंतर काही वेळाने दोघी बेशुद्ध पडल्या. काही वेळाने गणेश घरी आल्यानंतर त्यांना दोघी बेशुद्ध अवस्थेत सापडल्या. त्यांना तत्काळ जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, प्रांजलचा मृत्यू झाला. तर, रेखा या औषधापासून बचावल्या. त्यांच्यावर उपचार करून मंगळवारी घरी सोडण्यात आले आहे. याप्रकरणी पौड पोलिसांनी खून व आत्महत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून रेखा याना अटक केली आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक एन. आर. गायकवाड यांनी सांगितले की, महिलेला रुग्णालयातून सोडण्यात आले असून याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे.