हार्डवेअरच्या दुकानातून ५० हजार चोरल्याच्या कारणाने दोघा भावांनी आपल्या तिसऱया सख्ख्या भावाचा डोक्यात लोखंडी रॉड घालून खून केला. सोमवारी रात्री ही घटना घडली. भैरव चौधरी (वय २८, रा. बी. टी. कवडे रस्ता, घोरपडी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. पोलीसांनी याप्रकरणी दोन भावांसह तिघांना अटक केली आहे.
स्वतःच्या दुकानातून ५० हजार चोरल्याच्या कारणामुळे चौधरी कुटुंबातील तीन भावंडांमध्ये सोमवारी संध्याकाळी वादावादी झाली. या वादाचे पर्यवसान पुढे एका भावाचा खून करण्यात झाले. भैरव चौधरी यांचा खून केल्यानंतर तिन्ही आरोपींनी मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो पोत्यात घातला आणि मारुती व्हॅनमधून तो खंडाळ्याकडे घेऊन निघाले. मात्र, लोणावळ्याजवळ पोलीसांच्या गस्ती पथकाने मारुती व्हॅन अडवली आणि चौकशी सुरू केल्यावर घडलेला प्रकार समोर आला. पोलीसांनी तातडीने व्हॅनमधील तिघांना अटक केली. या प्रकरणी सोमवारी रात्री एक वाजता मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस पुढील तपास करीत आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 24, 2014 12:05 pm