पुण्यामध्ये करोनाचा संसर्ग पुन्हा वाढल्याचे चित्र दिसत आहे असं महापौर मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट केलं. मात्र त्याचवेळी त्यांनी लॉकडाउन हा काही तातडीचा उपाय नाहीय असं सांगत त्यांनी पुणेकरांना लगेच लॉकडाउनला सामोरं जावं लागणार नसल्याचं म्हटलं आहे. मागील आठवड्यात असणारा कोरोनाचा ४.६ टक्के इतका पॉझिटिव्हीटी दर आता १२.५ टक्क्यांवर पोहोचला असून उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढली आहे. या पार्श्वभूमीवर आज तातडीने आढावा बैठक घेत विविध सूचना प्रशासनाला दिल्या आहेत, असं मोहोळ यांनी ट्विटवरुन म्हटलं आहे. रुग्ण संख्या वाढत राहिल्यास भविष्यात काही निर्बंध घालावे लागतील असंही मोहोळ यांनी सांगितलं आहे.

एकूण रोजच्या रुग्णांची संख्या वाढत आहे, पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येतही वाढ झालीय. त्याप्रमाणे अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची संख्या १३०० पर्यंत आली होती ती आता १७०० पर्यंत जाताना दिसत आहे. संपूर्ण शहरातील सर्व भागात रुग्ण वाढत आहेत अशीही स्थिती नाहीय. एकूण शहरातील महानगरपालिकेचे चार वॉर्ड ऑफिस आहेत त्यापैकी चार वॉर्ड ऑफिसमध्ये रुग्णसंख्या वाढत आहे. यामध्ये सिंहगड रोड, वारजे, विबेवाडी क्षेत्रीय कार्यालय आणि नगर रोड क्षेत्रीय कार्यालय परिसर आहे. या चार वॉर्डच्या हद्दीत रुग्णसंख्या वाढताना दिसतेय असंही मोहोळ यांनी सांगितलं आहे. मात्र त्याचवेळी त्यांनी निर्णय घेण्यात आले तरी या चार वॉर्ड ऑफिस क्षेत्रासंदर्भात घेतले जातील असं सांगत पुण्यामध्ये सध्या तरी पुन्हा लॉकडाउन करण्याचा निर्णय घेणं हा उपाय ठरु शकत नाही असं म्हणत लॉकडाउनची शक्यता फेटाळली आहे.

नेमक्या काय उपाययोजना करणार आहोत, नव्याने निर्बंध काही लादायचे का यासंदर्भात या या बैठकीमध्ये चर्चा झाली. पुण्यामध्ये आजही १७ ठिकाणी स्वॅब कलेक्शन सेंटर सुरु आहेत. हे सेंटर बंद करण्यात आलेले नाहीत. पुण्यामध्ये आजही चार हजारच्या आसपास बेड उपलब्ध आहेत. चाचण्यांची संख्याही कमी झालेली नाही. रोज तीन ते चार हजार चाचण्या आजही केल्या जातात. सध्या या चार वॉर्ड ऑफिसच्या क्षेत्रामध्ये चाचण्यांची संख्या, आरोग्य कर्चमाऱ्यांची संख्या आणि मॅन पॉवर वाढण्यासंदर्भातील नियोजन महापालिका करत आहे. निर्बंध लादावेत किंवा लॉकडाउन करावं किंवा कंटेनमेंट झोन घोषित करावं अशी परिस्थिती सध्या तरी पुण्यात नाहीय. मात्र पुढील काही दिवस अशीच रुग्ण संख्या वाढत राहिल्यास या चार वॉर्ड ऑफिसच्या हद्दीत कंटेनमेंट झोन करावे लागतील अशी चर्चा झाल्याचे मोहोळ यांनी टीव्ही ९ मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं.

शहरामध्ये मास्कचा विषय, कार्यक्रम, लग्न यासारख्या ठिकाणी गर्दी वाढताना दिसतेय. त्यामुळे आता या ठिकाणी पोलिसांनीही कारवाई करावी याबद्दल बैठकीमध्ये चर्चा झाली. एका बाजूला उपाययोजना आणि दुसरीकडे काही कठोर नियमांची अंमलबजावणी अशा दोन मुद्द्यांवर आम्ही काम करत असल्याने लवकरात लवकर ही परिस्थिती आटोक्यात आणण्यात आम्हाला यश येईल असा विश्वास महापौरांनी व्यक्त केला आहे. या कोरोना आढावा बैठकीला उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते गणेश बिडकर, शिवसेना गटनेते पृथ्वीराज सुतार उपस्थित होते.

कोरोना आढावा बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे…

> सिंहगड रोड, नगर रोड, बिबवेवाडी आणि वारजे क्षेत्रीय कार्यालय परिसरात संसर्ग वाढतोय.

> संसर्ग वाढला तर पुन्हा कंटेन्मेंट झोन सुरु करण्याचा विचार.

> महानगरपालिका नव्याने अँटिजेन टेस्ट किट खरेदी करण्याचा निर्णय घेतला.

> संसर्ग वाढत असलेल्या चार वॉर्ड ऑफीस परिसरात नव्याने स्वॅब कलेक्शन सेंटर सुरु केली जात आहेत.

> आरोग्य विभागाला पुन्हा अतिरिक्त मनुष्यबळ पुरवले जाणार आहे.

> सर्व प्रकारचे १ हजार १६३ शासकीय बेड्स सज्ज

> खासगी रुग्णालयांना कोरोनाचे अतिरिक्त बेड्स उपलब्ध करण्याच्या सूचना दिल्या गेल्यात.

> मास्कसंदर्भातील कारवाईची अंमलबजावणी प्रभावीपणे केली जाणार आहे.