संग्रहालय चालकांपुढे अडचणींचा डोंगर

पुणे : सर्वाधिक कमाई देणाऱ्या एप्रिल आणि मे महिन्यात व्यवहार ठप्प झाल्यामुळे उत्पन्न नसताना कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी पैसे कोठून आणायचे अशा कात्रीमध्ये संग्रहालयाचे चालक सापडले आहेत. आपल्या संस्कृतीचा अमूल्य ठेवा जतन करताना खर्चाच्या अडचणींचा डोंगर कसा पार करायचा, असा प्रश्न संग्रहालय चालकांना पडला आहे.

संग्रहालयातील वस्तूंची दैनंदिन साफसफाई, देखभाल आणि दुरुस्ती यासाठी कर्मचाऱ्यांची आवश्यकता असते. एकीकडे तिकिट विक्रीद्वारे मिळणारे उत्पन्न शून्य असताना या कर्मचाऱ्यांना वेतन देण्यासाठीचा खर्च करावा लागणार आहे. हा ताळेबंद कसा साधायचा ही चिंता संग्रहालयाच्या संचालकांना भेडसावत आहे. डॉ. दिनकर केळकर ऊर्फ ‘कवी अज्ञातवासी’ या एकाच व्यक्तीने छंद म्हणून जमा केलेल्या वस्तूंचे संग्रहालय असा लौकिक असलेले राजा दिनकर केळकर संग्रहालय हे गेल्या सहा दशकांपासून पुणेकरांच्या सेवेत कार्यरत आहे.  दरवर्षी सुमारे सव्वा लाखांहून अधिक पर्यटक भेट देतात.  प्रवेश शुल्काद्वारे संग्रहालयाला दरवर्षी ५५ ते ६० लाख रुपये उत्पन्न मिळते. त्यापैकी एप्रिल आणि मे या सुटीच्या दोन महिन्यांमध्येच २० लाख रुपये तिकिट विक्रीद्वारे मिळतात.  दोन महिन्यांपासून संग्रहालय बंद असल्यामुळे हे उत्पन्न बुडाले आहे. शासकीय निर्देशानुसार कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन देण्याासाठी पैसे कोठून आणायचे हा प्रश्न भेडसावत असल्याचे संग्रहालयाचे संचालक सुधन्वा रानडे यांनी सांगितले.

रेल्वेच्या वेगवेगळ्या प्रतिकृतींचा समावेश असलेले कोथरूड परिसरातील जोशी रेल्वे  संग्रहालय पाहण्यासाठी एप्रिल आणि मे या दोन महिन्यांत साधारणपणे पाच हजार लोक येतात. प्रत्येकी शंभर  याप्रमाणे पाच लाख रुपयांचे उत्पन्न होते. ते  बुडाल्यामुळे आता कामगारांना वेतन देण्याचा प्रश्न कठीण झाला आहे, त्यासाठी सरकारने कर्ज काढण्याची सोय उपलब्ध करून दिली असली तरी त्याची परतफेड करावी लागणार आहे, याकडे  संग्रहालयाचे संचालक रवी जोशी यांनी  लक्ष वेधले.

पाच वर्षांपासून अनुदानात कपात

राजा दिनकर केळकर संग्रहालयाला राज्य शासनाकडून वार्षिक ६० लाख रुपयांचे अनुदान मंजूर आहे. पण, गेल्या पाच वर्षांपासून ‘सर्वसाधारण अर्थसंकल्पीय कपात’ या शीर्षकान्वये अनुदानामध्ये ३० ते ५० टक्क्य़ांपर्यंत कपात होत आहे. गेल्या वर्षी अनुदानापोटी ४२ लाख रुपये मिळाले होते, असे सुधन्वा रानडे यांनी सांगितले. अर्थात शासनाचे प्राधान्यक्रम असतील त्यानुसार निधी उपलब्ध होत असल्यामुळे अनुदानाच्या कपातीसंदर्भात कोणतीही तक्रार नाही. पण, संग्रहालयाच्या विकासामध्ये पैशांची कमतरता भासते हे वास्तव नाकारता येत नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

भविष्यामध्ये वेगळ्या खर्चासाठी तरतूद

गर्दी टाळण्यासाठी एकावेळी २५ जणांना सोडण्याची बंधने येऊ शकतात. संग्रहालय पाहण्यासाठी येणाऱ्यांना सॅनिटायझर आणि मास्क या सुविधा उपलब्ध करण्यासाठी वेगळ्या खर्चाची तरतूद करावी लागेल, याकडे रवी जोशी यांनी लक्ष वेधले.