स्वामी कृपाकरानंद यांचे मत

विश्वामध्ये कोणीही बेसुर नाही. आपल्या दैनंदिन जीवनातच संगीत सामावलेले आहे. दररोजच्या बोलण्यातही संगीत आहे. मनाची सुरांबरोबर अगदी उत्स्फूर्तपणे तार जोडली जाते. त्यामुळेच सूर वैश्विक आहेत, असे मत प्रसिद्ध गायक आणि वाराणसी येथील रामकृष्ण मठाचे स्वामी कृपाकरानंद यांनी शुक्रवारी व्यक्त केले.

आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित ६७ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवातील ‘अंतरंग’ या कार्यक्रमात माजी आमदार उल्हास पवार यांनी स्वामी कृपाकरानंद यांची मुलाखत घेतली. त्या वेळी ते बोलत होते. ज्येष्ठ गायक पं. जगदीश प्रसाद यांचे शिष्य असलेले स्वामी कृपाकरानंद हे एमबीबीएस डॉक्टर असून नंतर त्यांनी संन्यास स्वीकारला. त्यापूर्वी ‘षड्ज’ या उपक्रमामध्ये उषा देशपांडे दिग्दर्शित ‘ख्याल’ हा लघुपट दाखविण्यात आला.

माझ्यामध्ये जन्मापासूनच संगीत होते असे मला वाटते, असे सांगून कृपाकरानंद म्हणाले, पूर्वीपासून लोकगीतांच्या स्वरूपात संगीत सामान्य माणसाच्या जीवनाचा भाग होते. लोकगीत कधी कानाला बेसुर वाटले तरी ते वाळूतील सोन्याच्या तुकडय़ासारखे असते. संगीतातील पंडित आणि उस्ताद यांनी या सोन्याच्या तुकडय़ाला चकाकी आणली. सूर एका शुद्ध स्वरूपात एकत्र बांधले आणि रागदारी निर्माण झाली. भारतातील लोकांच्या रोमारोमामध्ये अध्यात्म भरले आहे.

संगीत साधनेबद्दल स्वामी कृपाकरानंद म्हणाले, संगीत ही ऋषींची देणगी आहे. त्यामुळे देशावर कितीही आक्रमणे झाली तरी आक्रमक आपले संगीत नष्ट करू शकले नाहीत. भारतीय संगीत टिकून आहे आणि ते चिरंतन राहील. प्रकृतीच्या प्रत्येक रूपामध्ये संगीत आणि राग आहेत. तुम्हाला ते ऐकता यायला हवेत. अगदी पावसाळ्यात बेडकांच्या ओरडण्यामध्येही संगीत ऐकता येते. गुरूकडे संगीत शिकणे हे उत्तमच आहे. परंतु गाणे आत्मसात करण्यासाठी कोणतीही कॅप्सूल मिळत नाही. गुरू तुम्हाला संगीत ऐकवू शकतो. ते समजून घेण्याचे काम तुमचे आहे. सारेच कलाकार होऊ शकले नाहीत तरी चांगले रसिक घडतील.