माहिती तंत्रज्ञानातील क्रांतीचा उपयोग करणारी युवा पिढी बुद्धिमान आहे. कष्ट करण्याची तयारी या अर्थाने मेहनती आहे. अभ्यास आणि करीअर सांभाळून संगीताची उपासना करीत आहे. हे सारे चित्र आशादायी असून अभिजात संगीताचे भविष्य उज्ज्वल आहे यात शंकाच नाही. असे असले तरी  संगीत ही गुरुमुखी विद्याच आहे हे ध्यानात घेतले पाहिजे, अशी भावना ज्येष्ठ गायक पं. उल्हास कशाळकर यांनी सोमवारी व्यक्त केली. गुरूसमोर बसून जे शिकता येते आणि त्यातून जो विद्यार्थी घडतो त्याची सर रेकॉर्डिगच्या माध्यमातून शिकण्याला कशी येणार याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
जयपूर, ग्वाल्हेर आणि आग्रा या तीन घराण्यांच्या गायकीची तालीम घेत समृद्ध झालेले ज्येष्ठ गायक पं. उल्हास कशाळकर मंगळवारी (१३ जानेवारी) वयाची साठ वर्षे पूर्ण करीत आहेत. घरातील सांगीतिक वातावरण, गुरूंकडून मिळालेली तालीम आणि श्रवणभक्तीमधून झालेली घडण या आठवणींना कशाळकर यांनी उजाळा दिला.
पं. उल्हास कशाळकर म्हणाले, घरातच गाणं होतं. माझे मोठे भाऊ गायन करणारे होते. त्यामुळे ते गाण्याचे संस्कार नकळतच माझ्यावर झाले. स्पर्धामध्ये भाग घेऊन बक्षिसे मिळविली तशाच काही शिष्यवृत्ती मिळाल्या. वयाच्या २० व्या वर्षीपर्यंत हे असेच सुरू होते. त्यावेळी काही गवई बनूयात असे ठरविले नव्हते. पं. राम मराठे आणि पं. गजाननबुवा जोशी अशा दिग्गजांकडून तालीम मिळाली. हातचे राखून न ठेवता भरभरून देणाऱ्या या गुरूंनी माझ्यावर खूप मेहनत घेतली. मलाच किती घेता आले हा प्रश्न आहे. गुरूंची तालीम, विविध कलाकारांच्या गायन श्रवणातून मिळालेले अनौपचारिक शिक्षण आणि रसिकांचे प्रेम यामुळे मी घडलो. अजूनही बरीच वाटचाल करायची आहे. काही राग शिकायचे आहेत. सध्या मैफली आणि विद्यादान यामध्येच व्यग्र आहे. त्यामुळे जीवनप्रवास शब्दबद्ध करण्यासंदर्भात अजून विचार केलेला नाही.
संगीत हा विषयच मुळी व्यापक आहे. ही गुरुमुखी विद्या आहे. खूप गाणं ऐकून एखाद्याला गाता येईल असे नाही. गुरूने जे शिकविले ते किती आत्मसात केले आणि किती उपयोगामध्ये आणले हे कळायलादेखील गुरूच लागतो. कित्येकदा शिष्याच्या कळण्यामध्ये गडबड झाली तर, ही विद्या एकतर्फी होण्याची शक्यता आहे. गुरू-शिष्य परंपरेमध्ये गुरूसमोर बसून दुरुस्त करण्याची मुभा आहे. हे रेकॉर्डिगवरून होणार नाही. अर्थात काळानुरूप नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यास माझा विरोध नाही. पण, ते किती उपयुक्त आहे हे काळच ठरवेल. ज्यांचे अर्धवट शिक्षण झाले आणि परदेशामध्ये गेले त्यांना या माध्यमातून आपला संगीताचा छंद जोपासता येईल. न जाणो त्यातूनही एखादा कलाकार घडू शकेल, असेही कशाळकर यांनी सांगितले.