पंडित फिरोज दस्तूर मेमोरियल फाउंडेशनच्या वतीने हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील ज्येष्ठ गायक पंडित उल्हास कशाळकर यांच्या षष्टय़ब्दीपूर्तीनिमित्त संगीत समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती फाउंडेशनचे विश्वस्त चंद्रा पै यांनी दिली. हा संगीत कार्यक्रम सर्वासाठी खुला आणि विनामूल्य असणार आहे.
हा कार्यक्रम १३ जानेवारी रोजी टिळक स्मारक मंदिर येथे सायंकाळी ६ वाजता होणार आहे. या वेळी कार्यक्रमाच्या विशेष संकेतस्थळाचे अनावरणही केले जाणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून चिन्मय मिशनचे प्रमुख स्वामी तेजोमयानंद यांची उपस्थिती लाभणार आहे. तसेच, या कार्यक्रमाला हिंदुस्थानी संगीतातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
पं. फिरोज दस्तूर हे भीमसेन जोशी यांचे गुरुबंधू होते. हिंदुस्थानी रागसंगीताची परंपरा प्रवाहित ठेवण्यात पंडित कशाळकर यांचे मोठे योगदान आहे. पं. कशाळकर यांना पं. गजाननबुवा जोशी यांच्याकडून ख्यालगायकीची बहुपेडी समृद्ध परंपरा लाभली, तर पं. राम मराठे यांच्याकडून बुद्धिप्रवण गायकीची प्रेरणा मिळाली आहे. कोलकाता येथील आय.टी.सी संगीत रीसर्च अकादमी येथे पं. कशाळकर हे १९९३ पासून निवासी गुरूम्हणून कार्यरत आहेत.