‘आघाडीच्या तीन गायकांच्या आवाजात.. जय जय रामकृष्ण हरीचा गजर आणि बहारदार अभंगांची भक्तिमय सांगीतिक मेजवानी पुणेकर रसिक शुक्रवारी (१७ जुलै) अनुभवणार आहेत. सायंकाळी साडेसहा वाजता गणेश कला क्रीडा रंगमंच येथे हा कार्यक्रम होणार आहे. ‘बोलावा विठ्ठल’ या कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. ‘लोकसत्ता’ या कार्यक्रमाचे माध्यम प्रायोजक आहे.
पंचम-निषाद तर्फे गेली दहा वर्षे भक्तिगीत गायनाच्या ‘बोलावा विठ्ठल’ या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या वर्षी देशभरातील बारा शहरांमध्ये हा कार्यक्रम होणार असून त्याची सुरुवात पुण्यापासून होणार आहे. सध्याच्या आघाडीच्या शास्त्रीय गायकांच्या आवाजात अभंगवाणीचा आनंद रसिकांना घेता येणार आहे. पुण्यातील कार्यक्रमात भक्तिसंगीताचा अभ्यास असलेल्या ग्वाल्हेर घराण्याच्या गायिका सावनी शेंडे, वसंतराव देशपांडे यांच्या गायकीचा वारसा पुढे नेतानाच स्वत:ची ओळख निर्माण करणारे गायक राहुल देशपांडे आणि भारतातील जवळपास प्रत्येक मोठी मैफल गाजवणारे किराणा घराण्याचे गायक जयतीर्थ मेवुंडी सहभागी होणार आहेत. प्रसिद्ध तबलावादक साई बँकर, संवादिनीवादक आदित्य ओक आणि पखवाजवादक प्रकाश शेजवळ यांच्या साथीने ही सांगितिक वारी रंगणार आहे. तीनही गायकांनी एकत्रित केलेल्या गजराने कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. एकत्रित गायनाबरोबरच तीनही गायकांचे स्वतंत्रपणेही सादरीकरण होणार आहे.
कार्यक्रमाला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. कार्यक्रमाच्या काही प्रवेशिकांची विक्री कार्यक्रमाच्या दिवशी म्हणजे १७ जुलैला होणार आहे. यशवंतराव चव्हाण नाटय़गृह, बालगंधर्व रंगमंदिर येथे दुपारपर्यंत आणि त्यानंतर कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रवेशिका मिळतील.
 कार्यक्रम कुठे होणार – गणेश कला क्रीडा रंगमंच
कधी – १७ जुलै, सायंकाळी ६.३०
प्रवेशिका कुठे मिळतील – दुपारपर्यंत – बालगंधर्व रंगमंदिर, यशवंतराव चव्हाण नाटय़गृह, दुपारनंतर – गणेश कला क्रीडा रंगमंच, स्वारगेट.