श्रीराम ओक

उदयोन्मुख कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या ‘शुद्धनाद’ या संस्थेमार्फत आतापर्यंत तीसहून अधिक छोटेखानी मैफली आयोजित करण्यात आल्या होत्या. या मैफिलीत शंभरहून अधिक कलाकारांनी गायन, वादनाचे सादरीकरण केले. विविध कलागुणांनी नटलेल्या या कलाकारांच्या सादरीकरणाला रसिकांनी भरभरून दाद दिली. त्यातूनच काही मोठय़ा मैफिलींचे आयोजन संस्थेमार्फत करण्यात येऊ लागले. छोटेखानी मैफिलीतील पंचवीस कलाकारांसह ही तिसरी मैफल येत्या रविवारी (३१ मार्च) होत आहे. त्यात गायन, वादनासह जुगलबंदीचा आस्वादही घेता येणार आहे

नवोदित कलाकारांसह तीसहून अधिक छोटेखानी मैफिली, शंभरहून अधिक कलाकरांनी केलेल्या सादरीकरणातून पंचवीस उत्तमोत्तम कलाकारांसह ‘शुध्दनाद’तर्फे ‘उपज-अनलाशिंग द राइजिंग’ या एकदिवसीय मैफलीचे आयोजन  रविवारी (३१ मार्च) करण्यात आले आहे. नवोदित कलाकारांकडे असलेले गुण समाजापुढे यावेत याबरोबरच वेगळे ऐकण्याची संधी रसिकांना मिळावी यासाठी संस्थेचा प्रयत्न आहे.

मैफिलीचे आयोजन करणे म्हणजे केवळ संगीत सादरीकरणाला प्रोत्साहन देणे नसून संभाव्य कलाकार आणि श्रोत्यांची नवीन पिढी तयार करणे आणि प्रत्येक कलाकाराने केलेल्या प्रयत्नांबद्दल जागरूकता आणि महत्त्व उत्पन्न करणे हा विचार शुद्धनादला अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवायचा आहे. त्यातूनच हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतप्रेमी असलेले व स्वत: कलोपासक असलेल्या अश्विन गोडबोले, अनुप कुलथे आणि कपिल जगताप यांनी सुरू केलेल्या ‘शुद्धनाद’ मार्फत या मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे.

युवा कलाकारांना त्यांच्या पारंपरिक कलामध्ये एक नावीन्यपूर्ण जागा शोधून काढण्यास आणि ज्ञात सीमांच्या पलीकडे जाण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी, शुध्दनाद रविवारी (३१ मार्च) त्यांचा नवीन प्रयोग म्हणजे हा कार्यक्रम असल्याचे आयोजक सांगतात. संपूर्ण एक दिवस, अकरा तास आणि बावीस कलाकारांना घेऊन या कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम तीन सत्रांमध्ये विभागला गेला असून अभिनव प्राथमिक शाळेच्या ऑडिटोरियममध्ये हा कार्यक्रम सशुल्क होणार आहे.  सकाळच्या पहिल्या सत्रात (सकाळी १० ते दुपारी १) तेजस कोपरकर यांचे गायन होणार असून त्यांना संवादिनीवर सौमित्र क्षीरसागर तर तबल्यावर पार्थ ताराबादकर साथ करणार आहेत. सतार आणि सरोदचे सहवादन अनिरुद्ध जोशी आणि अभिषेक बोरकर करणार असून त्यांना तबल्यावर रोहित मुजुमदार साथ देणार आहेत.

दुसऱ्या सत्रात (दुपारी २ ते यायंकाळी ५.२०) तराण्यांचे सादरीकरण होणार असून यात चिन्मयी आठले, सानिका कु लकर्णी सहभागी होणार असून त्यांना संवादिनीवर अभिनय रवंदे तर तबल्यावर आशय कुलकर्णी साथ करणार आहेत. याशिवाय देवश्री नवघरे यांचे गायन होणार असून त्यांना संवादिनीवर लीलाधर चक्रदेव आणि तबल्यावर रोहन चिंचोरे साथ देणार आहेत. अजिंक्य जोशी आणि पांडुरंग पवार यांची तबला जुगलबंदी होणार असून या वेळी अभिषेक शिनकर संवादिनीवर साथ करणार आहेत.

तिसरे सत्र सायंकाळी (सायंकाळी ६ ते रात्री ९) होणार असून यात अनुप कुलथे यांचे व्हायोलिन एकलवादन होणार असून त्यांना तबल्यावर प्रणव गुरव साथ करतील. सौरभ काडगावकर आणि विनय रामदासन सहगायन करणार असून संवादिनीवर रोहित मराठे तर तबल्यावर अजिंक्य जोशी साथ करणार आहेत. हा कार्यक्रम म्हणजे कानसेनांसाठी अपूर्व संधी आहे.